मनसे कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती; शिवसेना-मनसे युतीची चर्चा

मुंबई, २२ मार्च २०२३ : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात राजकीय घडामोडींना वेग येत आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक डोंबीवली येथील फडके रस्त्यावरील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात हजेरी लावली. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात शिवसेना – मनसे युतीबाबत चर्चा ऐकायला मिळत आहे.

श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे चैत्र पाडव्यानिमित्त काढण्यात आलेल्या नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होण्यासाठी आलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक डोंबीवली येथील फडके रस्त्यावरील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात हजेरी लावली. शिंदे यांचे मनसे कार्यालयात आगमन होताच मनसेचे कल्याण ग्रामीणचे आ. प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी त्यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत गेले.

यावेळी एकमेकांनी नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या. शुभे्च्छांचा स्वीकार केल्यानंतर काही क्षणात मुख्यमंत्री शिंदे मनसे कार्यालयातून बाहेर पडले. त्यांच्या सोबत खा. डाॅ. श्रीकांत शिंदे होते. मात्र शिंदे यांनी मनसे कार्यालयाला दिलेल्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. तसेच आगामी काळात शिवसेना – मनसे युती होण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप