“धिंगाणा घालायचा नाही,” पंकजा मुंडेंनी तंबी दिल्यानंतरही समर्थकांचा गोंधळ, पोलिसांचा लाठीचार्ज
बीड, ५ आॅक्टोबर २०२२: विजयादशमीच्या निमित्ताने भगवान भक्तीगडावर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून आयोजित दसरा मेळाव्याला समर्थकांनी गर्दी केली होती. मात्र यावेळी समर्थकांनी गोंधळ घातल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पंकजा मुंडे यांचं भाषण संपताच समर्थकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. यामुळे पोलिसांवर गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्याची वेळ आली.
भाषणाच्या सुरुवातीला पंकजा मुंडे यांनीही गोंधळ घालणाऱ्यांना शांत बसण्याचं आवाहन केलं होतं. “माझं भाषण होईपर्यंत हाताची घडी, तोंडावर बोट पाहिजे. ही धिंगाणा घालण्याचं ठिकाण नाही,” असं सांगत त्यांनी गोंधळ घालणाऱ्या तरुणांना तंबी दिली होती.
दरम्यान पंकजा मुंडे यानी यावेळी भाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. “माझ्या अंगात हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघणाऱ्या छत्रपती शिवरायांचे संस्कार, भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे यांचं रक्त आहे. मी संघर्षाला घाबरत नाही. मी थकणार नाही, कधीही कुणासमोर झुकणार नाही असा निर्धार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. हा चिखल फेकणाऱ्यांचा नाही, तर चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे असंही त्यांनी सांगितलं.
“हा चिखल फेकणाऱ्यांचा नाही, तर चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे. चिखल तुडवणं, संघर्ष करणं हे आमच्या रक्तात आहे. जे गोपीनाथ मुंडेंचे विरोधक होते, ज्यांनी मला विरोध केला, पातळी सोडून माझ्यावर टीका केली त्यांच्यावर मी बोलले नाही, कधी कुणावर वैयक्तिक आरोप केले नाही, खालच्या पातळीवर टीका केली नाही. कुणी काही चुकलं तर त्या व्यक्तीवर बोलायला संधीचा फायदा घेतला नाही. ते आमच्या रक्तातच नाही,” असं पंकजा मुंडेंनी म्हटलं.
“खुर्च्या लावल्या असत्या तर हा मेळावा चारपट झाला असता”
‘हकीकत को तलाश करना पडता हैं, अफवा तो घर बैठे बैठे मिल जाती हैं’ असा शेर म्हणत त्यांनी आपल्यासंबंधी चर्चांवरही भाष्य केलं. “इथं जमलेले लोक ही ‘हकीकत’ आहे, माझी शक्ती आहे. माझ्याकडे तुम्हाला बसायला द्यायला खुर्च्या नव्हत्या, तुमची व्यवस्था करण्याची माझी ऐपत नाही. तुम्ही दाटीवाटीने इथं बसला आहात. खुर्च्या लावल्या असत्या तर हा मेळावा किती मोठा झाला असता. किमान चारपट तरी झाला असता. तुम्ही जमिनीवर बसणं गोड मानलं,” असं सांगत पंकजा मुंडेंनी आभार मानले.
“ज्या पक्षात कुणीच जात नव्हतं त्या पक्षात गोपीनाथ मुंडे गेले”
“गोपीनाथ मुंडेंना संघर्ष नव्हता का? त्यांच्या वाट्याला कायम संघर्ष आला. प्रवाहाविरोधात जात ज्या पक्षात कोणीच जात नव्हतं, त्या पक्षात गोपीनाथ मुंडे कमळाचं फुल हातात घेऊन आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढले. त्यांचा संघर्ष कमी झाला का? ४० वर्षांच्या राजकारणात केवळ साडेचार वर्षे सत्ता मिळाली. हा संघर्ष कमी आहे का? त्या गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष आपल्यासमोर आहे,” असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.