शिंदे-फडणवीसांमध्ये मांजर बोक्याची वाटणी आहे का? ‘त्या’ प्रकरणावरून संजय राऊत संतापले
नागपूर, ,२१ डिसेंबर २०२२: नागपूर भूखंड घोटाळा प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. नागपूर भूखंड घोटाळा हा गंभीर असून एकनाथ शिंदे यांची वकिली देवेंद्र फडणवीस का करत आहेत? शिंदे-फडणवीसांमध्ये मांजर बोक्याची वाटणी आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊत यांनी आज माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी नागपूर भूखंड घोटाळ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.
संजय राऊत म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात कालच भ्रष्टाचाराचा आरोप समोर आलाय. ज्या भूखंडाचा वाद आहे, त्यात हायकोर्टानं सरकारच्या स्थगिती दिली आहे. तरीही नाक वर करून बोलताय.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची वकिली करतायत. ही काय मांजराची आणि बोक्याची वाटणी आहे का? 110कोटीची वाटणी आहे का? हे प्रकरण साधं असेल तर हायकोर्टाने स्थगिती का दिली याचं उत्तर द्या, असं संजय राऊत म्हणाले.
काय आहे प्रकरण?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तत्कालिन महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना, नागपूरात भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी उमरेड परिसरातील २ लाख चौरस फूच जमीन, जिची किंमत 83 कोटी होती, ती 2 कोटी रुपयात दिली असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणानंतर कोर्टाने नागपूर खंडपीठाने ताशेरे ओढल्यानंतर शिंदे यांनी निर्णय़ रद्द केला होता. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया काय?
विरोधकांनी आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. नागपूर सुधार प्रन्यास प्रकरणी मी कोणताही गैरव्यवहार केला नाही, अशी भूमिका शिंदे यांनी काल स्पष्ट केली. गुंठेवारी कायद्यानुसार जसे 33 लोकांना भूखंड दिले गेले, तसेच 16 लोकांना देण्याचा निर्णय झाला होता. हे प्रकरण न्यायालयात असल्याने याबाबत समितीच्या अहवालाचं काय झालं, याची कल्पना नसल्याचं शिंदे यांनी सांगितलं.