शरद पवार अन् भाजप नेत्यात फोनवर चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

मुंबई, ८ मे २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या तीन टप्प्यातील मतदान संपल्यानंतर चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली आहे. यात आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काल पत्रकार परिषदेत शरद पवारांबाबत खळबळजनक दावा केला. चार दिवसांपूर्वी शरद पवार आणि देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची फोनवर चर्चा झाली. ही चर्चा नेमकी कशाची होती याचा खुलासा शरद पवार यांनी करावा अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे.

शरद पवार यांनी चार दिवसांपूर्वी राजनाथ सिंह यांना फोन का केला याचा खुलासा झाला पाहिजे. हा फोनमध्ये राष्ट्रवादीच्या पाच जागांबाबत काही चर्चा झाली का, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत ज्या तीन जागा लढवत आहेत त्यावर काही बोलणं झालं का किंवा उद्धव ठाकरेंबाबत काही बोलणं झालं काय याची माहिती शरद पवारांनी द्यायला हवी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीत जागावाटपाच्या चर्चात जी मागणी केली होती त्याची आठवण आंबेडकरांनी पुन्हा करून दिली. यावेळी आंबेडकरांनी सांगितले होते की पुढील पाच वर्ष जोवर विधानसभा, लोकसभा बरखास्त होत नाही तोपर्यंत भाजपबरोबर जाणार नाही याबाबत आश्वासन द्या अशी आठवण प्रकाश आंबेडकर यांनी यानमित्ताने करून दिली.

शरद पवार आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यात फोनवर काय चर्चा झाली याची माहिती शरद पवारांनी दिली पाहिजे. बारामतीच्या मैदानावर परिणाम होऊ नये यासाठी ही माहिती आम्ही उशिरा दिली. परंतु, आता या दोन्ही नेत्यात काय चर्चा झाली याची माहिती मिळाली पाहिजे, असेही वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. शरद पवार यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कशासाठी फोन केला असावा असा प्रश्न विचारला जात आहे. आता या प्रश्नावर आणि प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.