सगळा डाव देवेंद्र फडणवीसांनी रचला- चंद्रकांत खैरे यांचा गंभीर आरोप

औरंगाबाद, ९ ऑक्टोबर २०२२: शिवसेनेचं निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव गोठवण्याचे हंगामी आदेश निवडणूक आयोगानं शनिवारी रात्री दिले. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. दोन्ही गटांकडून अजूनही चिन्हासाठी आणि नावासाठी दावेदारी केली जात असली, तरी आयोगाच्या निर्णयामुळे आगामी अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत या चिन्हाचा आणि नावाचा वापर दोन्ही गटांना करता येणार नाहीये. यावरून दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले आहेत. शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीसांनी हा सगळा डाव रचल्याचा गंभीर आरोप केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक चिन्हाबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला असल्याचं स्पष्ट केल्यानंतर आयोगाकडून नेमका कोणता निर्णय घेतला जाणार, यावरून चर्चा रंगली होती. शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत दोन्ही गटांकडून कागदपत्र आयोगापुढे सादर करण्यात आली होती. संध्याकाळी चार तास आयोगाची महत्त्वपूर्ण बैठक झाल्यानंतर यासंदर्भातला निर्णय जाहीर करण्यात आला. त्यामुळे आगामी अंधेरी पोटनिवडणुकीत दोन्ही गटांना धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव वापरता येणार नाही.

यावरून टीका करताना चंद्रकांत खैरेंनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. “निवडणूक आयोग स्वायत्त असलं, तरी केंद्र सरकारच्या हाताखाली काम करतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या यंत्रणा आपल्या हातात ठेवल्या आहेत. मंत्र्यांच्या हातातही काहीही नाही. देवेंद्र फडणवीस त्यांचे खास आहे. देवेंद्र फडणवीसांनी हा सगळा डाव रचला आहे”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

“शिंदेंनी फार मोठं पाप केलं”
“हे एक प्रकारचं संकट आहे. उद्धव ठाकरे फार संयमी आहेत. संघर्ष करण्याचा त्यांचा पवित्रा असतो. आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संघर्ष करत राहू. एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली. फार मोठं पाप केलं आहे या सगळ्या गद्दारांनी. आत्तापर्यंत धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्या शिवसैनिकांचं मन दुखतंय. आम्ही सगळ्यांनी निर्धार केला आहे की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संघर्ष करू आणि पुन्हा जिंकून येऊ”, असंही खैरे यावेळी म्हणाले.

“फडणवीसांनी असं करायला नको होतं”
एकनाथ शिंदे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह मिळू शकत नाही. देवेंद्र फडणवीसांचं सरकार, मोदींचं सरकार जर हे सगळं करत असेल, तर जनता २०२४ ला त्यांना दाखवून देईल. यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांचा हात आहे. त्यांना मोदींचा पाठिंबा कितपत मिळतोय, हे माहीत नाही. देवेंद्र फडणवीसांनी असं करायला नको होतं”, अशा शब्गांत खैरेंनी फडणवीसांवर टीकास्र सोडलं.

“भाजपा असं सगळ्या राज्यातले विरोधी पक्ष संपवायला लागली, तर लोकशाहीचं काय राहिलं? हा लोकशाहीचा खून आहे. या सगळ्यांनी लोकशाहीचा खून केलाय”, असंही ते म्हणाले.