प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करा – सत्यजीत तांबेंनी केली पत्राद्वारे मागणी

अहमदनगर, १५/०१/२०२४: अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही सार्वजनिक सुटी जाहीर करावी, अशी आग्रही विनंती आ. सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यातील उत्सवी वातावरण लक्षात घेता रस्त्यांवर मोठ्या संख्येने मिरवणुका निघतील. त्यामुळे रस्त्यांवर वाहतुकीची अडचण होऊ शकेल. नोकरीधंद्यासाठी बाहेर पडणाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना याचा फटका बसू नसे आणि त्यांनाही या आनंदात सहभागी होता यावं, यासाठी हा निर्णय घ्यावा, असं आ. तांबे यांनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या उभारणीचं काम जोमाने सुरू असून २२ जानेवारी २०२४ रोजी या मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दिवस देशभरात दिवाळीसारखा साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. त्यानिमित्ताने राज्यातही तयारी सुरू झाली असून २२ जानेवारी रोजी राज्यातील सर्वच शहरांमध्ये आणि गावांमध्ये मिरवणुका, आतषबाजी आणि उत्सवाचं वातावरण असेल. राज्यात असलेल्या या उत्सवी वातावरणामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत लोकांना हा दिवस उत्साहात साजरा करता यावा, यासाठी उत्तर प्रदेश सरकारने याआधीच सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. अशीच सुट्टी महाराष्ट्र सरकारनेही जाहीर करावी, अशी विनंती आ. सत्यजीत तांबेंनी पत्राद्वारे केली.

महाराष्ट्रात अशी सुट्टी जाहीर झाली, तर सर्वच लोकांना या उत्सवात सहभागी होणं शक्य होईल. तसंच रस्त्यावर होणाऱ्या उत्सवामुळे कोणालाही वाहतुकीची अडचण होणार नाही. सुट्टी असेल, तर वाहतुकीच्या खोळंब्याचा त्रास कामावर जाणाऱ्या किंवा शाळा-महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार नाही. तसंच कामावर जाणाऱ्या लोकांनाही या उत्सवात सहभागी होता येईल. ही गोष्ट लक्षात घेऊन सोमवार, २२ जानेवारी २०२४ रोजी सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालये, आस्थापने, शाळा, महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर करावी, असेही आमदार सत्यजीत तांबेंनी पत्रात म्हटले आहे.