जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले ओमानच्या प्रतिनिधींचे स्वागत
पुणे, 14 जानेवारी 2023- पुणे येथे १६ व १७ जानेवारी रोजी आयोजित जी-२० बैठकीसाठी विविध देशांच्या प्रतिनिधींचे आज लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यामध्ये रशिया, ओमान आणि ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अॅंड डेव्हलपमेंटच्या सदस्यांचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी ओमानच्या प्रॉडक्शन ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंटचे संचालक सलीम अहमद बाओमर आणि सलीम एम.अलबत्ताशी यांचे संध्याकाळी आगमनप्रसंगी पुणेरी पगडी घालून आणि शाल घालून स्वागत केले.
तत्पूर्वी सकाळी रशियाचे प्रतिनिधी वदीम आन्द्रेवीच टारकीन यांचे, दुपारच्या सत्रात रशियाचे दिमित्री अटापीन आणि ओईसीडीचे कोर्टनी व्हीलर यांचे पुणेरी पगडी घालून आणि शाल घ़ालून ढोल ताशाच्या गजरात आणि तूतारीच्या निनादात पारंपारिक पद्धतीने प्रशासनाच्यावतीने स्वागत करण्यात आले.
स्वागतासाठी राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, पुणे महानगरपालिका उपायुक्त किशोरी शिंदे, विमानतळ संचालक संतोष ढोके, सहायक संचालक संजय दुलारे उपस्थित होते.
बैठकीसाठी येणाऱ्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी प्रशासनाने जय्यत तयारी तयारी केली आहे. भरजरी पोशाखात ढोल ताशा वादक, तूतारी वादक पथक ठेवण्यात आले आहे. जी-२० परिषदेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेचे फलक सर्वत्र प्रदर्शित करण्यात आले आहे.