मुख्यमंत्री शिंदे भाजपचे गुलाम : संजय राऊत
मुंबई,१९ फेब्रुवारी २०२४ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर बंद खोलीत चर्चा झाली नाही, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली होती. येथे भाजपचे इतर नेते होते.लशिंदे हे भाजपचे गुलाम आणि नोकर झाले आहेत. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे अशाप्रकारची बेताल वक्तव्ये ते करतात. अमित शहा ‘मातोश्री’वर कशासाठी आले होते, याचे उत्तर महाशयांनी द्यावे,” असे आव्हान राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिले.
ते म्हणाले, ” हे लोक किती खोटे बोलतात. अमित शहा ‘मातोश्री’वर कशासाठी आले होते, हा प्रश्न या महाशयांनी स्वतःला विचारावा. बंद
दाराआड चर्चा करताना हे (एकनाथ शिंदे) ‘मातोश्री’वर नव्हते. मी तिकडे उपस्थित होतो. यांना काय स्थान होते, कोण होते हे, पक्षाचे नेतेही नव्हते. आम्ही सगळ्यांनी मिळून यांना पक्षाचा नेता केले,” अशी टीका राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली.
“आम्ही पळपुटे नाही आहोत. बाळासाहेबांची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवली नाही. बनावट शिवसेनेच्या अधिवेशनात नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा ठराव मांडण्यात आला. ही लाचारी कशासाठी, बाळासाहेब ठाकरे असते, तर यांचा कडेलोट केला असता. हिंमत असेल तर मुंबई आणि ठाणे
महापालिकेच्या निवडणुका घ्या,” असे आव्हानही राऊतांनी मुख्यमंत्र्यांना दिले.