“BMC आयुक्त चहल शिंदे-फडणवीस सरकारला घाबरत आहेत, त्यामुळे…”, लटकेंच्या उमेदवारीवरून किशोरी पेडणेकरांचा गंभीर आरोप

मुंबई, १२ आॅक्टोबर २०२२: अंधेरी पूर्व निवडणुकीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांचा पालिकेतील नोकरीचा राजीनामा स्वीकारला जात नसल्याने त्यांच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. अशातच त्या शिंदे गटात जाणार असल्याच्याही चर्चा आहे. यावर मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल चहल शिंदे-फडणवीस सरकारला घाबरत आहे, असा आरोप केला.

किशोरी पेडणेकर म्हणाले, “ऋतुजा लटके यांची बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बांधिलकी आहे. त्यांनी स्वखुशीने राजीनामा दिली. एवढंच नव्हे, तर नियमाप्रमाणे, नोकरी सोडताना एक पूर्ण पगार पालिकेकडे भरला आहे. मात्र, डीएमसी मिलिंद सावंत, आयुक्त इकबाल चहल आणि इतर अधिकारी यांना नियमाने कामं करायची नसतील, तर आमचं म्हणणं आहे की ‘चले जाव’. त्यांनीही पालिकेतून निघून जावं. मुंबई महानगरपालिका, राज्य आणि देशात कोणती हुकुमशाही सुरू आहे?”

“ऋतुजा लटके स्वखुशीने राजीनामा देत आहेत. त्यांचा राजीनामा दाबून ठेवला जात आहे. असं असताना ते दावा करतात की आम्ही बाळासाहेबांचा विचार घेऊन चाललो आहे. मग लोक प्रश्न का विचारणार नाही?” असा सवाल किशोरी पेडणेकरांनी विचारला.

पेडणेकर पुढे म्हणाल्या, “शिंदे-फडणवीस सरकारल पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्यावर दबाव आणत आहे. सनदी अधिकारी नेहमी नियमाने काम करतात. मात्र, इथं इकबाल चहल त्यांना घाबरत आहेत. शिंदे-फडणीस सरकार इकबाल चहल यांना घाबरवत आहे. तसेच नियमाची पायमल्ली करत आहेत. नियमांना पायदळी तुडवत आहेत.”

“महाराष्ट्रात गेल्या चार महिन्यात पाहिलं आहे की, जे आमदार विघ्न आणण्याचा प्रयत्न करत आहेत, दादागिरीची भाषा करत आहेत त्यांना नियम लागू होत नाही. त्यांच्यावर केसेस नाहीत,” असाही आरोप पेडणेकरांनी केला.