भाजप निर्दयी पक्ष! पहिला नंबर अजित पवारांचा अन् निवडणुकीनंतर गद्दारांचा – राऊतांनी थेटच सांगितलं
मुंबई, २३ सप्टेंबर २०२४ : भाजपवर कुणी विश्वासच ठेऊ नये. आज अजित पवारांचा काटा काढतील, निवडणूक झाली की शिंदे गटाचा काटा काढतील. कारण आम्ही त्यांचा अनुभव घेतलेला आहे. तसंच, भाजपने अशी वागणूक देशातील अनेक त्यांच्या मित्रपक्षाला दिली आहे. त्यामुळे अजित पवारांना बाहेर काढण्याचं षडयंत्र सुरू झालं आहे. असा थेट घणाघात शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
भाजपला जास्त जागा लढवायला मिळतील या अनुषंगाने आता अजित पवारांना बाहेर काढण्याचं काम चालू झालं आहे. या कामात शिंदे गटाचा मोठा वाटा आहे असंही संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत. तसंच, झारखंड, हरियाणा येथील निवडणुकीचा खर्ज भाजप शिंदे गटाकडून घेत आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केली आहे. त्यामुळे लवकरच या लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे असंही ते म्हणाले.
महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू झालेली आहे भाजपने १७० जागांवर दावा सांगितलेला आहे. तर उर्वरित १२८ जागा या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विभागून देण्याची भाजपची तयारी आहे. केवळ ६४ जागांवर निवडणूक लढविण्यास अजित पवार तयार नाहीत. किमान ८० ते ९० जागा मिळाल्या पाहिजेत असा आग्रह आहे. अजित पवार यांच्या अपेक्षेपेक्षा २५ ते ३० जागा कमी मिळत असल्याने त्यांच्यावर अन्याय होणार असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे निवडणूक लढतील अशी चर्चा रंगली आहे. अजित पवार आणि भाजपचे नेत्यांनी देखील या चर्चेस स्पष्ट पणे खोटी चर्चा आहे असे सांगत महायुती एकत्र निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केलेले आहेत. पण आता संजय राऊत यांनी केलेल्या आरोपामुळे पुन्हा एकदा या विषयाच्या चर्चेला सुरुवात झालेली आहे.