अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश, देवेंद्र फडणवीस म्हणाले; आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस

मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४ ः काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. आत्तापर्यंत जे काही झालं ते झालं. आता मी माझ्या राजकीय कारकिर्दीची नवी सुरुवात करतो आहे असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं. तर देवेंद्र फडणवीस यांनी हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे अशा शब्दात चव्हाण यांचे स्वागत केले.
सोमवारपर्यंत काँग्रेसमध्ये असलेले अशोक चव्हाण यांनी सोमवारीच आपल्या आमदारकीचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपा प्रवेशाबाबत भाष्य केलं नव्हतं. आज अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती भाजपात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे.

फडणवीस म्हणाले, “आज आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे की महाराष्ट्रातलं एक ज्येष्ठ नेतृत्व आमच्याकडे आलं आहे. देशाची लोकसभा आणि विधानसभा गेली अनेक वर्षे ज्यांनी गाजवली. विविध मंत्रिपदं ज्यांनी भुषवली आणि दोनवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकीर्द आपल्याला पाहायला मिळाली असे अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करत आहेत. मी सर्वात आधी भाजपाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंती यांना अशोक चव्हाण यांचा प्राथमिक सदस्यत्वाचा फॉर्म आहे त्यावर सही करुन त्यांना भाजपात प्रवेश द्यावा. “

दरम्यान, अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. शंकरराव चव्हाण यांच्याकडूनच त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. त्यांचे सुपुत्र म्हणून शंकरराव चव्हाण यांचा राजकीय वारसा सांभाळण्याच्या अशोक चव्हाण यांनी त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न केला. वडील आणि मुलगा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याचं शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण यांचं एकमेव उदाहरण आहे. २८ ऑक्टोबर १९५८ या दिवशी अशोक चव्हाण यांचा जन्म मुंबईत झाला. विज्ञान शाखेत पदवी घेतल्यानंतर त्यांनी एमबीए केलं. १९८५ मध्ये संजय गांधी निराधार योजनेचे नांदेड शहराचे चेअरमन झाले. तिथून त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. प्रकाश आंबेडकर यांचा जेव्हा त्यांनी निवडणुकीत पराभव केला तेव्हा अशोक चव्हाण हे अवघ्या ३० वर्षांचे होते. १९८७ ते १९८९ या कालावधीत ते खासदार होते. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. १९८६ ते १९९५ या कालावधीत अशोक चव्हाण हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्षही होते. १९९९ मध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आणि ते निवडूनली आहे. त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीचा आलेख चढता राहिला.