अमित शहांऐवजी फडणवीसांच्या उपस्थितीत अशोक चव्हाणांचा प्रवेश
मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४ ः . महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही वेळापूर्वी अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. पण आता यावरून टीका सुरु झाली आहे. चव्हाण यांचा प्रवेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे होणार होता, पण त्यात बदल करून फडणवीस यांच्या हस्ते प्रवेश करून घेण्याची वेळ अशोक चव्हाणांवर आली. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपचे बॉस फडणवीसच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाण यांचा आधी १५ फेब्रुवारीला गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार होता. पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम विभागासाठी ते आग्रही होते. मात्र भाजपमधील एका बड्या नेत्याने या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. त्यानंतर चव्हाण यांना एक राज्यसभेची उमेदवारी आणि घरात एक विधानसभेची उमेदवारी देण्याचे मान्य झाले. चव्हाण यांनीही या प्रस्तावाला संमती दर्शविली. १५ फेब्रुवारी हा राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्याने अशोक चव्हाण यांनी लगबगीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी काल (१२ फेब्रुवारी) काँग्रेस सोडताच रविभवन / नाग भवनसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (पीडब्ल्यूडी) ना हरकत प्रमाणपत्राची (एनओसी) मागणी केली. १२ हजार ३०० रुपयांची थकबाकी लगेच भरली. पीडब्ल्यूडीनेही घाईघाईने सोमवारी सायंकाळीच एनओसी जारी केली. साधारणपणे खासदार आणि आमदारांना निवडणूक लढवण्यासाठी रविभवनची एनओसी आवश्यक असते. उमेदवारी अर्जासोबत त्यांना येथेही एनओसी द्यावी लागते. त्यानंतर (१३ फेब्रुवारी) तातडीने छोटेखानी समारंभात भाजपात प्रवेश उरकून घेतला. त्यामुळे आता त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
अशोक चव्हाण यांचा आमित शहा यांच्या दौऱ्यात प्रवेश झाला असता तर त्यांचे थेट राष्ट्रीय नेतृत्वाकाली प्रवेश झाल्याने काँग्रेसमध्ये मोठा संदेश गेला होता. त्यानुसार नियोजनही करण्यात आले होते. पण काँग्रेसमधून आलेल्या नेत्याने फडणवीस यांना ओलांडून अमित शहाकडे जाणे हे भाजपमधील नेत्यांना पटलेले नाही. त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजीचा विचार करता ऐनवेळी हा निर्णय बदलण्यात आला. त्यामुळे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांना एकवेळा मुख्यमंत्री असलेल्या फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश करावा लागला. त्यावरून अशोक चव्हाण यांना मानाचे पान मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.