ठाकरे आंबेडकरांचे जुळले, शिवसनेसोबत युती करण्याची वंचित बहुजन आघाडीने दाखवली तयारी
मुंबई, ३० नोव्हेंबर २०२२ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी आगामी निवडणुकांमध्ये युती करण्याची वंचित बहुजन आघाडीने तयारी दर्शविली आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर व शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यात दोन बैठका झाल्या असून, युतीच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अलीकडेच प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या संकेत स्थळाच्या उद्घाटन कार्यक्रमात उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर एकत्र आले होते. त्या वेळी उद्धव ठाकरे यांनी आमचे वैचारिक व्यासपीठ एक असल्याचे सांगून प्रकाश आंबेडकरांबरोबर हातमिळवणी करण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीर मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन रेखा ठाकूर यांनी पक्षाची शिवसनेबरोबर युती करण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली.
वंचित बहुजन आघाडीची शिवसेनाबरोबर युती करण्याबाबत चर्चा सुरू आहे. या बाबतीत आघाडीच्या बाजूने आम्ही आमचा होकार कळवला आहे. आमच्या वतीने पक्षाचे राज्य समितीचे सदस्य महेंद्र रोकडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन व वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांची शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुभाष देसाई, तसेच त्यांचे काही खासदार यांच्या बरोबर दोन बैठका झाल्या आहेत, त्यात युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली.
शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यांच्यामध्येही दोन बैठका झाल्या असून युती संबंधी सकारात्मक चर्चा झाली आहे. वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्र विकास आघाडीचा भाग बनविणार व चार पक्षीय आघाडी करून निवडणूक लढवणार की, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी हे मिळून निवडणुका लढवणार हे स्पष्ट करावे, असे वंचित आघाडीच्या वतीने शिवसेनाला सांगण्यात आले आहे. त्यांच्याकडून त्याबाबत उत्तर आल्यानंतर युतीबाबतची पुढील चर्चा सुरू होईल, असे रेखा ठाकूर यांनी सांगितले.
शिवसेनेने यापूर्वी रामदास आठवले यांच्याशी युती करून शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग केला होता. हा प्रयोग मुंबई महानगरपालिका निवडणुकीत यशस्वी झाला होता. हा अनुभव लक्षात घेऊनच शिवसेनेने आंबेडकर यांच्याशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे.