अजित पवारांच्या गाडी वाटपाचा सर्वाधिक फायदा पुण्याला

पुणे, २९ डिसेंबर २०२३ ः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्वतःच्या गटाचा प्रभाव निर्माण करण्याचा खटाटोप करत असताना पुणे जिल्ह्यात अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यातच आता पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अजित पवारांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांना गाड्या देण्याचा निर्णय घेतलेला असून, त्याचा सर्वाधिक लाभ पुणे जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे. पुण्याला तीन किंवा चार गाड्या मिळणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच त्यांच्या गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत येथे घेतली. त्यामध्ये त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांना चारचाकी दिल्या जाणार आहेत. गाड्या उपलब्ध झाल्याने प्रत्येक अध्यक्षाला त्यांच्या भागात फिरण्याची सोय होईल, यातून पक्ष संघटना मजबूत होईल, असे सांगितले. पवार यांच्या या घोषणेनंतर मुंबई येथे अजित पवार गटाच्या पक्ष कार्यालयात चारचाकीची चाचणी घेण्यात आली आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

राज्यातील पदाधिकाऱ्यांसाठी सुमारे ८० गाड्या घेतल्या जाणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात ग्रामीणचा अध्यक्ष आणि शहराचा अध्यक्ष असे दोन पदाधिकारी आहेत. मात्र, पुणे यासाठी अपवाद ठरण्याची शक्यता आहे. पुणे ग्रामीणचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, शहराचे अध्यक्ष दीपक मानकर, पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष अजित गव्हाणे असे तीन अध्यक्ष आहेत. तर पुणे शहरासाठी प्रदीप देशमुख यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे पुण्यात तीन अध्यक्षांसह एक कार्याध्यक्ष यांना चारचाकी मिळण्याची शक्यता आहे.

पूर्वीपासून अजित पवार यांनी पुणे, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण भागात स्वतःचा दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून भाजप सोबत सत्तेत आल्यानंतर त्यांनी त्यांचे दबावतंत्र वापरून पालकमंत्रीपद भाजपकडून हिसकावून घेतलेले आहे. त्यानंतर आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठीही अजित पवार यांनी कंबर कसली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी जाहीरपणे भाष्यही केले आहे. विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या गटाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याची क्षमता पुणे जिल्ह्यात आहे. त्यामुळे पवार यांनी संघटनेच्या पातळीवरही पुणे शहर, जिल्हा, पिंपरी-चिंचवडवर लक्ष केंद्रीय केले आहे. त्याचा लाभ येथील पदाधिकाऱ्यांनाही होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच त्यांची जबाबदारी देखील वाढली आहे.

पुणे शहर, जिल्हा, पिंपरी चिंचवडमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे स्वतःची चारचाकी असल्याने त्यांना गाडीची आवश्‍यकता नाही. पण पक्षाच्या धोरणानुसार गाडी मिळाल्यास ती विविध आघाड्यांचे अध्यक्ष, इतर पदाधिकाऱ्यांना वापरता येईल. यातून संपर्क वाढविण्यात हातभार लागेल, असे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले.

कोट
‘‘पक्षाकडून गाडी मिळाल्यास ही गाडी संघटनेच्या विस्तारासाठी वापरली जाईल. महिला, युवा यासह इतर आघाड्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी त्यांच्या आवश्यकतेनुसार गाडीचा वापर करू शकतील. त्यामुळे या निर्णयाचा नक्कीच फायदा होईल.’’
– दीपक मानकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)