देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्तीनंतर निलेश राणे पुन्हा राजकारणात
सिंधुदुर्ग, २५ ऑक्टोबर २०२३: माजी खासदार निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय अवघ्या २४ तासात मागे घेतला आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी तलवार म्यान केली आहे. संघटनेतील काही गोष्टींमुळे राणेंनी हा निर्णय घेतला होता, मात्र आता त्यांची नाराजी दूर झाली आहे. आता यापुढील काळात त्यांच्या नेतृत्वात आम्ही सिंधुदुर्ग-रत्नागिरीमध्ये काम करु, कोकणात जो त्यांचा झंझावत आहे, तो असाचं सुरु राहिलं, असं चव्हाण यांनी यानंतर बोलताना स्पष्ट केलं.
मात्र त्याचवेळी निलेश राणे यांच्या निवृत्ती नाट्याच्या स्टोरी ही वडील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याच आशीर्वादाने लिहिली असल्याचे बोलले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्याचे आणि आगामी काळातील निवडणुकांचे राजकारण यामागे असल्याचे सांगितले जाते. शिवाय सध्याच्या आणि आगामी राजकारणाचा थेट संबंध हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याशी असल्याचा दिसून येतो.
नारायण राणे यांची राज्यसभेची मुदत पुढील वर्षी संपत आहे. त्यानंतर भाजप त्यांना काय जबाबदारी देणार, हे सध्या अनिश्चित आहे. पण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातून उमेदवारीसाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. इथून सध्या राणेंचे निकटवर्तीय आणि भाजपचे निष्ठावंत प्रमोद जठार हे पक्षातूनच इच्छुक आहेत. तर त्याचवेळी शिंदे गटातून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांनीही इथून तयारी सुरु केली आहे.
निलेश राणे यांना २०१९ च्या निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाकडून लढताना पाऊणे तीन लाखांच्या आसपास मते मिळाली होती. मूळ भाजपची तीन लाख आणि राणेंची पाऊणे तीन लाख अशी सहा लाखांच्या आसपास मते असल्याने हा मतदारसंघ भाजपकडेच घ्यावा असा दावा करत नुकतेच नितेश राणे आकडेमोड केली होती. हा मतदारसंघ भाजपकडे घेऊन तिथून नारायण राणे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी राणे समर्थकांकडूनही केली जात आहे.
निलेश राणेंची विधानसभेसाठी तयारी :
दुसऱ्या बाजूला निलेश राणे यांनी नारायण राणे यांच्या कुडाळ मतदारसंघातून तयारी सुरु केली आहे. या मतदारसंघाचे प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे. २०१४ मध्ये नारायण राणे यांना याच मतदारसंघातून पराभव स्विकारावा लागला होता. त्याची सल राणे कुटुंबांच्या मनात आजही कायम आहे. मात्र शेजारी कणकवलीमध्ये नितेश राणे विद्यमान आमदार आहेत. मग आता दोन्ही भावांना विधानसभेला आणि वडिलांना लोकसभेला उमेदवारी कशी द्यायची असा सवाल पक्षातच विचारला जात आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंकडून राणेंच्या घराणेशाहीला विरोध?
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा गेल्याच आठवड्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा दौरा झाला. या दौऱ्यात बावनकुळे यांनी एकाच घरात तीन तिकिटे देणार नसल्याचा स्पष्टपणे संकेत दिला. याच संकेतांचा परिणाम बावनकुळे यांच्या दौऱ्यावर जाणवला. स्वतः निलेश राणे या दौऱ्यात फारसे दिसून आले नाहीत. शिवाय राणे समर्थकही या दौऱ्यापासून लांब राहिलेले दिसून आले.