वसंत मोरेंची लोकसभेसाठी फिल्डींग पवार, राऊत यांची भेट घेतल्यानंतर आता धंगेकरांशी चर्चा
पुणे, १५ मार्च २०२४ ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची गुरूवारी पुण्यात भेट घेतली. त्यांनतर आज ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांची भेट घेतली. पण ते कोणत्या पक्षात जाणार हे स्पष्ट केले नाही. पण लोकसभा लठविण्यावर मी ठाम असून, पुण्यात गेल्यावर आमदार रवींद्र धंगेकर यांच्याशीही बोलणार आहे असे मोरे यांनी सांगितले.
मनसेतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून वसंत मोरे यांनी पक्षाला रामराम केला आहे. त्यावरून पुण्यात मनसे आणि वसंत मोरे यांच्या आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मोरे हे शरद पवार यांच्या गटात सहभागी होणार अशी चर्चा सुरु असताना काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी त्यांना काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यानंतर मोरे पवारांना भेटले पण निर्णय न घेता बाहेर पडले. त्यानंतर वसंत मोरे यांना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी फोन केला होता, त्यावेळी मोरे यांनी दिली. राऊत यांना भेटण्याची वेळ मागितली होती, त्यानुसार ही भेट झाली आहे. पुढच्या या दोन दिवसात मला पुढे काय भूमिका घ्यायची आहे, असे मोरे यांनी सांगितले.
तसेच मोरे म्हणाले, मी माझी भूमिका मविआतल्या नेत्यांसमोर मांडली आहे. मला वाटतं मला संधी मिळेल. मला पुणेकरांच्या भल्यासाठी निवडणूक लढवायची आहे. आता हे नेते योग्य तो मार्ग काढतील. अजून कोणत्याही पक्षात जाण्याचा मी निर्णय घेतलेला नाही. पुण्यात वॉशिंग मशीन नको ही सगळ्यांचीच भूमिका आहे. तीच भूमिका डोळ्यांसमोर ठेवून मी भेटीगाठी घेत आहे.
पुणेकरांच्या हिताची निवडणूक करायची आहे. मी कुणालाही लपून भेटत नाही, सर्वासमोर भेटतोय. सर्व नेत्यांशी सकारात्मक चर्चा झाली. मविआच्या नेत्यांकडून मला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. सगळ्यांचे म्हणणं आहे की पुण्यामाध्ये वॉशिंग मशीन नको तर मीसुद्धा त्याच मताचा आहे. पुण्यात कोणत्याही परिस्थितीत वॉशिंग मशीन नसायला पाहिजे.
पुण्याला गेल्यावर रविंद्र धंगेकरांना भेटणार. माझा विषय धंगेकरांना सांगणार. मी लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम. मी ज्या विषयासाठी पक्ष सोडला आहे त्या विषयावरती मी आता काम करतो आहे. पुण्यातील नागरिकांसाठी मला पुणे लोकसभा लढायची आहे, असेही मोरे म्हणाले.