शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणतात, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप

मुंबई, १५ मार्च २०२४ ः लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजप, काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये भाजपाने महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तर दुसरीकडे महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाची उमेदवारांची यादी बाकी आहे. महायुतीमधील कोणताही वाद नसलेल्या जागा भाजपाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. आता शिवसेना शिंदे गटाची यादी रविवारी किंवा सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मोठे भाष्य केले आहे.

शिवसेना शिंदे गटाची लोकसभा उमेदवारांची यादी सोमवारपर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले. याबरोबरच आघाडी आणि युतीबाबत भाष्य करत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत त्यांनी दिले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत ‘रासप’चे नेते महादेव जानकर यांना एक जागा देण्याचे आश्वासन शरद पवारांनी दिले असल्याची माहिती महादेव जानकर यांनीच दिली होती. यावर संजय शिरसाट म्हणाले, “शरद पवारांच्या भेटीला अनेकजण जात आहेत. महादेव जानकरदेखील जातील. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, येत्या दोन दिवसांत आमच्याकडे (शिवसेना शिंदे गटाकडे) येणाऱ्यांची संख्या जर पाहिली तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. येत्या सोमवारी मोठे भूकंप पाहायला मिळतील”, अशी सूचक प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.

‘एमआयएम’ नावाला उरणार नाही
‘एमआयएम’ महाराष्ट्रात लोकसभेच्या सहा जागा लढवण्याची शक्यता आहे. याबाबत छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी तसे संकेतदेखील दिलेले आहेत. याबरोबरच खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांचा प्रचार देखील सुरू केला असून २०२४ ची लोकसभा निवडणूक जिंकणार असा दावा ते करत आहेत. यावर शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले, “प्रत्येक उमेदवार आपल्या शैलीत प्रचार करत असतो. पण यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एमआयएम’ नावालादेखील उरणार नाही, एवढे निश्चित आहे.”

वंचित आणि महाविकास आघाडीची युती होणार नाही
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची युती होणार असल्याची चर्चा सरू आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठकादेखील पार पडत आहेत. तर महाविकास आघाडीने ‘वंचित’साठी चार जागा देण्याचे मान्य केले. याबाबत शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मोठे विधान केले. ते म्हणाले, “आज महाविकास आघाडीची बैठक होत आहे. मात्र, या बैठकीला अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना बोलवले नाही, म्हणजे महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडीसोबत युती करायची नाही, हे स्पष्ट होत आहे. या आघाडीची सुरूवातच बिघाडीची आहे”, असे संजय शिरसाट म्हणाले.