विजय शिवतारे आणि अजितदादांशी मनोमिलन होणार का?

मुंबई, १५ मार्च २०२४ : बारामती लोकसभा मतदार संघाकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी पवार विरुद्ध पवार होणाऱ्या लढाईत टि्वस्ट तयार झाले आहे. बारामतीमध्ये नणंद सुप्रिया सुळे आणि भावजय सुनेत्रा पवार यांच्या लढाईची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. परंतु या लढतीत तिसरा खेळाडू आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी ही रंगत आणली आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीत आरपारची लढाई करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भेटण्यासाठी बोलवले. या बैठकीत नेमके काय झाले? याबाबत विजय शिवतारे यांनी ‘प्रसार माध्यमांना माहिती दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा तपशील विजय शिवतारे यांनी सांगितला. ते म्हणाले की, महायुतीने लोकसभेसाठी जे काही टार्गेट ठेवले आहेत या बाबत गाऊंड रिअ‍ॅलिटी काय आहे, हे आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले. महायुतीमध्ये जिंकणे हे मेरिट असेल तर सर्व बाजूने विचार करुन रिपोर्ट घ्यावे. कारण बारामतीमध्ये आतापर्यंत सुनेत्राताई पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असे चित्र होते. परंतु गेल्या चार पाच दिवसांमध्ये त्यात मोठा बदल झाला आहे. माझ्या उमेदवारीबाबत माहिती जाहीर होताच परिस्थिती बदलली आहे. यासंदर्भात गोपनीय रिपोर्ट घ्यावे, असे आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितल्याचे विजय शिवतारे यांनी सांगितले.

लोकशाहीमध्ये ताई-वहिणी अशी लढत म्हणणे चुकीचे आहे. फक्त कोणाच्यातरी सौभाग्यवती आहेत, यामुळे किती वर्षे त्यांनाच मतदान करणार आहोत. ही माझी मुलगी आहे म्हणून मते द्या, असे कसे चालणार आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे. महायुतीच्या धर्म म्हणजे जिंकून येणे हा निकष आहे. यामुळे मी माहिती दिल्यानंतर संपूर्ण रिपोर्ट तिन्ही पक्षाचे नेते घेतील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बारामतीमधील परिस्थिती आपण सांगितली आहे. तसेच जिंकण्यासाठी काय करावे लागणार हे सांगितले. लोकांमध्ये सध्या प्रचंड रोष आहे. मी माझ्या मतदार संघात सांगितले अजित पवार यांना मतदान करा, तरी लोक मतदान करणार नाही. लोक घड्यालाला मतदान करणार नाही. तिच परिस्थिती इंदापूर, भोर, खडकवासलामध्ये आहे. कारण अनेकांना त्यांनी दुखवले आहे. दादागिरी केली आहे. त्यांच्या वागण्यामुळे खूप रोष आहे. तो सर्व रोष मतपेटीतून निघणार आहे.

आपण उमेदवार जाहीर केल्यानंतर अजित दादांचा फोन नाही. मी एकवेळा मतभेट दूर करण्याचा माझा प्रयत्न केला होता. विमानतळावर त्यांना बुके दिले होते. परंतु ते बोललेसुद्ध नाही. यामुळे आता मनोलमिलन शक्य नाही. आयुष्यात कधीच मनोमिलन होणार नाही, असे विजय शिवतारे यांनी स्पष्ट सांगितले.