आम्ही तिघांनी ठरविले तर मार्ग निघेल : पवार
मुंबई, ३१जुलै २०२३: ‘राज्य सरकारशी बोलणे सध्या जरा अडचणीचे असले, तरी त्यातून आज ना उद्या काहीतरी मार्ग निघेल. मात्र त्यानंतर राज्य सरकारला मदत करणे भाग पडेल. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि मीसुद्धा आहे. आम्ही तिघांनी ठरवले तर महाराष्ट्रामध्ये नक्कीच बदल होईल,’ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केला.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सहा ऐतिहासिक ग्रंथांचे प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार बोलत होते. धुळ्यातील वि. का. राजवाडे संशोधन मंडळाच्या वतीने
हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि शरद पवार या कार्यक्रमात उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमाचे आणि ग्रंथांचे शरद पवार यांनी कौतुक केले. वि. का. राजवाडे संशोधन मंडळ संस्थेच्या कार्याबद्दल हीकौतुक केले आहे. धुळ्यात जे काम चालू आहे ते वाढवणे गरजेचे आहे. सध्या सरकारला काही सांगणे अवघड आहे. परंतु, मी, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांनी ठरवले तर काही अडचण येणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
हा अतिशय दुर्मीळ खजिना असून या खजिन्याचे जतन करण्यासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान जाहीर करत असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. शरद पवार यांनी या वेळी काही जुन्या आठवणी सांगितल्या. “राज्याचा प्रमुख असताना कर्नाटकला गेलो होतो. तिथे शिवाजी महाराज यांचे बंधू व्यंकोजी यांच्या राज्यात एक प्रशस्त ग्रंथालय होते. त्याठिकाणी मोडी भाषेत शिवाजी महाराज यांच्याबद्दल बरीच पुस्तक लिहिली होती. ते सर्व पाहून राज्यात परत आलो. पाच तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली. त्यांनी कर्नाटकातील ग्रंथालयात पाठवले. तिथल्या ग्रंथांचे मराठीत भाषांतर करण्याचे काम दिले होते. त्यामुळे शिवाजी महाराज यांचा इतिहास अधिक समृद्ध करण्यास मदत झाली,” असे पवार यांनी सांगितले. या वेळी पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलताना त्यांच्या छायाचित्रकलेचे कौतुक केले.