पंकजा मुंडेंवरचा अन्याय दूर न झाल्यास भाजपला किंमत मोजावी लागेल – प्रकाश महाजन
संभाजीनगर, ४ जून २०२३: भाजपमध्ये चार सुजान नेते आहेत. पंकजांवर जर अन्याय होत असेल तर तो दूर करण्याचा प्रयत्न करतील असं वाटतंय किंवा तसा प्रयत्न जर नाही झाला तर याचे निश्चित परिणाम येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपला भोगावे लागतील, असा इशारा मनसेचे नेते आणि पंकजा मुंडे यांची मामा प्रकाश महाजन यांनी दिला आहे.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या शनिवारी स्मृतीदिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम झाले. त्याचबरोबर गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांनी खास कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पंकजा मुंडे यांनी सडेतोड भाषण केलं. त्यामध्ये भाषणामध्ये अखेरीस रावणाचा उल्लेख केला, त्यात ही रावणाची उपमा कोणाला दिली हा प्रश्न शेवटी अनुत्तरीतच राहिला होता. मात्र पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी विविध मुद्द्यांवरुन पडदा उठवला आहे.
प्रकाश महाजन म्हणाले की, पंकजा मुंडे यांचं भाषण संपताना तो उल्लेख आला आणि मी आश्चर्यचकीत झालो. गोपीनाथ गड ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या प्रवासात मी तोच विचार करत होतो की, हा कोण असू शकतो? आता कसं आहे की, आपण कोणाचं नाव घेऊ शकत नाही, पण भाजप पक्षातलीच व्यक्ती असू शकते.
पंकजा मुंडेंच्या भाषणाचा पूर्वार्ध पाहिला तर लक्षात येईल की, त्यांनी सांगितलं होतं की, माझा एकच नेता आहे, ते म्हणजे अमित शाहा आणि मी त्यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे, त्यांना मी विचारणार आहे की, तुम्ही माझं काय करणार आहेत? हे जे वक्तव्य आणि या गोष्टींचा संदर्भ लक्षात घेतला तर महाराष्ट्रातलाच भाजपमधला मोठा नेता असू शकतो की, ज्याला रावणाची उपमा दिली जाऊ शकते. शेवटी तो भाजपचा अंतर्गत विषय आहे, त्याचं मला काय, पण एक पंकजाचा मामा म्हणा किंवा राजकीय पाहतो म्हणा पण मला एक अंदाज आहे की, भाजपमधली एक कोणीतरी महाराष्ट्रातलीच व्यक्ती आहे की, ज्याची तक्रार किंवा त्या गोष्टीचं मत मांडायचंय अमित शाहांकडे असं पंकजा मुंडेंचं मत असावं.
बाहेरच्या पक्षाच्या नेत्याचं पंकजा कशाला बोलेल? आणि परळीत कशाला बोलेल असाही सवाल यावेळी पंकजा मुंडेंचे मामा प्रकाश महाजन यांनी उपस्थित केला. भाजपमध्ये चार सुजान नेते आहेत. पंकजांवर जर अन्याय होत असेल तर तो दूर करण्याचा प्रयत्न करतील असं वाटतंय किंवा तसा प्रयत्न जर नाही झाला तर याचे निश्चित परिणाम येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपला भोगावे लागतील असं वाटत असल्याचं यावेळी प्रकाश महाजन यांनी सांगितलं आहे.
ही भाजपला न परवडणारी गोष्ट आहे. आणि काल भगवान गडावर जे लोक उपस्थित होते, त्या सर्वांना पंकजांची गरज आहे, म्हणून ते उपस्थित आहेत, त्यांना माहित आहे की, त्यांची उपस्थिती त्यांच्यावर नाराजगीचं कारणही असू शकतं पण तरिही ते उपस्थित आहेत. पण पंकजांच्या मनात असाकाही विचार नाही की, बाकीचे लोक समजत आहेत.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप