भाजपचा सर्वे सुरूच तर काँग्रेस नेते कश्मीरमध्ये
पुणे, २९ जानेवारी २०२३ ः कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने पाच उमेदवारांची नावे प्रदेशाकडे पाठविलेली असली तरी नागरिकांमध्ये काय कल आहे जाणून घेण्यासाठी भाजपचे अंतर्गत सर्वेक्षण सुरू असल्याचा त्याच अहवाल उमेदवार निश्चितीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा सोमवारी (ता. ३०) समारोप असल्याने सर्वच नेते तिकडे गेल्याने कसब्याच्या उमेदवारीचा विषय बाजूला पडला आहे. मात्र येत्या आठवड्यात दोन्ही पक्षाचे उमेदवार ठरविण्यासाठी घडामोडींना वेग येणार आहे.
आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. गेल्या पाच निवडणुकांपासून कसब्यातून सतत भाजपचाच उमेदवार निवडून आला असला तरी यावेळी काय होणार याकडे लक्ष लागले आहे. भाजपमधील संभावित पाच उमेदवारांची नावे प्रदेश भाजपकडे पाठविले आहेत. दरम्यान, भाजपने शहरा बाहेरील तीन संस्थांकडून उमेदवार कोण असावा यासाठी नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे, पुढील दोन दिवसात त्याचा अहवाल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पाठवला जाईल. त्यानंतर उमेदवारी जाहीर होईल असे सूत्रांनी सांगितले.
काँग्रेसमधून शहराध्यक्ष अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर, कमल व्यवहारे, संगीत तिवारी आदी इच्छुक आहेत. सध्या काँग्रेसमध्ये उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. शहरातील प्रमुख नेते व प्रदेशावरील नेते भारत जोडो यात्रेच्या समारोपासाठी जम्मू काश्मीरला गेले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस यावर कोणतीही चर्चा होणार नाही. तसेच कसब्याच्या निवडणुकीत महाविकास आघाडी होणार की नाही यावर आधी निर्णय घेतला जाणार आहे, त्यानंतरच काँग्रेसचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची येत्या आठवड्यात बैठक होऊन त्याचा निर्णय होईल. आघाडी झाली नाही तर कसब्यातील गणित मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत.
चहाचा गेम कोणी टाकला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोथरूड येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी कसब्यातील इच्छुक उमेदवार, माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी आले होते. कार्यक्रम संपण्यास वेळ असल्याने त्यांना सभागृहाच्या प्रतिक्षा कक्षात चहासाठी काही जणांनी बोलविले. त्यामुळे हे सर्वजण कक्षात गेले अन तेवढ्यात फडणवीस हे कार्यक्रम संपण्यापूर्वीच बाहेर पडले. त्यामुळे फडणवीस यांची इच्छुक व पदाधिकाऱ्यांची भेट घेता आली नाही. यानंतर मात्र, या भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ऐन मोक्याच्या क्षणी आपल्यावर चहाची गेम कोणी टाकली? याचा शोध घेण्याची चर्चा सुरू झाली.