लोकसभा निवडणुकीनंतर सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे भाजपात प्रवेश करतील – प्रकाश आंबेडकरांचा दावा
सोलापूर, ३ मे २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु आहे. दोन टप्पे पार पडले आहेत. तसंच तिसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार जोरदार सुरु आहे. सगळ्याच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरच्या सभेत एक मोठा दावा केला आहे. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे निवडणूक झाल्यानंतर भाजपात प्रवेश करतील असं त्यांनी म्हटलं आहे.
“सोलापूरच्या निवडणुकीत मुस्लिम मतदार निर्णायक आहेत. तुम्हीच निर्णय करायचा आहे की भाजपाला जिंकून द्यायचं की हरवायचं? अनेक मौलवी आज काँग्रेस काँग्रेस करत आहेत. त्यांनी विचारावं की देशभरात एकही मुस्लिम उमेदवार का दिला नाही? भाजपाची जी लाईन आहे त्यावरच काँग्रेस जात आहे.” असं प्रकाश आंबेडकर सोलापूरच्या सभेत म्हणाले.
ऑल इंडिया मुस्लिम फेडरेशनने सांगितलं की, जो भाजपाला हरवेल त्याला मतं द्या. काँग्रेसची मतं किती आहेत तुम्ही बघितलं, प्रणिती शिंदेंच्या मतांमध्ये वाढ होणार नाही. मुस्लिम बांधव जर तिथेच चिटकून राहिले तर तुमच्यामुळे इथे भाजपा निवडून येईल. मौलविंना आवाहन आहे की, तुम्ही मुस्लिम समुदायाच्या बाहेर पडा, त्यांना निर्णय द्यायचा असेल तर दुसऱ्या समुदायत जाऊन बसा. असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
हे पण वाचा- दारूडा आणि नरेंद्र मोदींची वृत्ती एकच, प्रकाश आंबेडकर यांची टीका
मी औरंगजेबच्या कबरीवर जाऊन चादर चढवली आणि सांगितलं आमच्यावर गुन्हा दाखल करून दाखवा. मुस्लिमांनो आता जर तुम्ही चूक केली तर तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. जर या सरकारला पुन्हा आणलं तर गल्लीगल्लीत पुन्हा गोध्रा आणि मणिपूर होईल. जर झालं तर तेव्हा काय काँग्रेस येणार का? गोध्रामध्ये तर काँग्रेस सहभागी होतं असं समोर आलं, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसंच सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे हे भाजपात प्रवेश करतील. निवडणूक झाली की त्यांचा भाजपा प्रवेश होईल असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना पुन्हा एकदा दारुड्या माणसाशी केली आहे.
मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या काळ्याकुट्ट काळात देशावरील कर्जाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पूर्वजांचे सोने, जमीन जुमला आपण सहसा विकत नाही. पूर्वजांनी ठेवून गेलेल्या मालमत्तेशी आपले आर्थिक, भावनिक आणि शाश्वत नाते असते. उद्याच्या संकटकाळात आपण वापरू शकतो. दारूच्या व्यसनात बुडालेले लोक बापजाद्यांची मालमत्ता संपवून टाकतात. दारूड्याची वृत्ती आणि पंतप्रधान नरेंद्र यांची प्रवृत्ती एकच आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.
मोदींच्या काळात तब्बल १७ लाख हिंदू कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व नाकारले आहे आणि ते सर्व परदेशात स्थायिक झाले आहेत, या आरोपाचा पुनरूच्चार करीत आंबेडकर म्हणाले, परदेशात स्थायिक झालेल्या हिंदू कुटुंबांकडे केलेल्या मागण्या पूर्ण करता येत नाहीत म्हणून त्यांना धमकावले जात आहे असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.