शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात दाखल; लोकसभेतील गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती
मुंबई, २० जुलै २०२२ : आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेचे १२ खासदारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले असून, शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या खासदारांच्या गटप्रवेशाने संसदीय पक्षाच्या फुटीवर शिक्कामोर्तब झाल़े. शिंदे गटाने लोकसभेतील गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती केली असून, त्यास लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिल्याचे सांगण्यात आल़े आहे.
या घटनेबाबत १२ बंडखोर खासदार तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली़.
शिंदे गटाने लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत यांच्या जागी राहुल शेवाळे यांची नियुक्ती करावी, अशी विनंती करणारे पत्र लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना मंगळवारी दिले. बिर्ला यांनी मान्यता दिल्याचे शेवाळे यांनी सांगितले. तर राज्यातील शिंदे गट-भाजपच्या युती सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
ठाकरेंच्या दुटप्पी वर्तनामुळे युती रखडली!
राज्याचे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन शिवसेना-भाजपच्या युतीबाबत तासभर चर्चा केली होती. पण, ही चर्चा झाल्यानंतर महिन्याभरात भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. या निलंबनामुळे युतीची शक्यता मावळली. एका बाजूला युतीची चर्चा करायची आणि दुसऱ्या बाजूला भाजपच्या आमदारांचे निलंबन करायचे, या उद्धव ठाकरेंच्या दुटप्पी वर्तनामुळे भाजपचे केंद्रातील नेतृत्व ठाकरे यांच्यावर नाराज झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी युती करण्यासाठी प्रयत्न करूनही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना प्रतिसाद दिला नाही, त्यानंतर युतीची चर्चा रखडली, असा दावाही शेवाळे यांनी केला.
महाविकास आघाडीला विरोध
शिवसेना महाविकास आघाडीमध्ये असून, ही आघाडी कायम राहिली पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांचे मत होते. मात्र, सर्व खासदारांनी त्यांना विरोध केला. त्यानंतर, ‘‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर, भाजपशी युती करण्यास मी होकार देईन, असेही उद्धव ठाकरे खासदारांना म्हणाले होते’’, असा दावाही शेवाळे यांनी केला. ‘एनडीए’च्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय उद्धव यांनी मान्य केला. मात्र, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांच्या सर्वसंमत उमेदवार मार्गारेट अल्वा यांना उद्धव यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, असल्याने ठाकरे यांच्या विरोधात जाऊन शिंदे गटात सहभागी होत असल्याचे स्पष्टीकरण खासदारांनी दिले.