कसबा गमविल्याने भाजप पुढे पुणे लोकसभा राखण्याचे आव्हान
पुणे, १३ एप्रिल २०२३ :भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघातील आगामी पोटनिवडणूक चुरशीची ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली असली, तरी काँग्रेसचाच उमेदवार भाजपसमोर उभा ठाकण्याची शक्यता आहे. कसबा पेठेतील पराभवामुळे भाजप अस्वस्थ झाला आहे, तर आघाडीतील पक्षांचे मनोधैर्य वाढले आहे. आगामी निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने पुण्याच्या पोटनिवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर मे महिन्यात पोटनिवडणूक होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जागा रिक्त राहत असल्यास सहा महिन्यांच्या आत निवडणूक घ्यावी लागते. त्या निवडणूक आयोग पावसाळ्यापूर्वी पोटनिवडणूक घेईल, असा अंदाज आहे. निवडणूक होण्याची शक्यता कमीच असल्याचे मतही काही राजकीय नेते व्यक्त करीत आहेत.
कसबा पेठ मतदारसंघातून बापट सलग पाचवेळा आमदार झाले व त्यानंतर पुण्याचे खासदा झाले होते. कसबा पेठेत त्यांच्यानंतर आमदार झालेल्या मुक्ता टिळक २८ हजारांच्या मताधिक्यान विजयी झाल्या होत्या. मात्र, त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले. भाजपने सर्वतोपरी प्रयत्न करूनदेखील आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र झाल्याने भाजपचा पराभव झाला. त्याची पुनरावृत्ती पुण्याच्या लोकसभा मतदारसंघात घडल्यास त्याचे दूरगामी परिणाम राज्याच्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर पडतील. त्यामुळे भाजपचे नेते सावध पवित्र्यात आहेत, तर काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. कसबा पेठेत टिळक कुटुंबीयांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. लोकसभेसाठी बापट यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देण्याची मागणी त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत. बापट यांची स्नुषा स्वरदा बापट यांचे नाव त्यासाठी चर्चेत आहे. बापट कुटुंबीयांनी मात्र यासंदर्भात काहीही मागणी केलेली नाही. त्यांच्याव्यतिरिक्त भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ
शिरोळे यांची नावेही चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. मात्र, जिल्ह्यातील चारपैकी तीन मतदारसंघांतून राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक लढवितात, तर पुण्यातून काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवितात. त्यामुळे यावेळीही काँग्रेसच निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. काँग्रेसतर्फे गेल्यावेळचे उमेदवार मोहन जोशी यांनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. आमदार धंगेकर, तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास ते भाजपपुढे तगडे आव्हान असेल.
अशी आहे सध्याची स्थिती
भाजपने कसबा गमावल्याने पुण्यात पोटनिवडणुकीसाठी चुरस आव्हान उभे करू शकतील. कारण, लोकसभा मतदारसंघातील सहापैकी दोन मतदारसंघांत विरोधी पक्षाचे आमदार आहेत. भाजपला कोथरूड आणि पर्वती या दोन मतदारसंघांत चांगले मताधिक्य मिळण्याची शक्यता असली, तरी उर्वरीत चार मतदारसंघांत त्यांना अटीतटीची लढत द्यावी लागेल. भाजपचे उमेदवार २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांत तीन लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून आले होते. त्यामुळे मतदारसंघात त्यांचे पारडे विरोधकांपेक्षा तुलनेने जड आहे. मात्र, एकत्रित विरोधकांसमोर लढताना त्यांचा कस लागणार आहे. त्यामुळे भाजपसमोर योग्य उमेदवार निवडण्याचे आव्हान आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप