‘राज्यातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपसोबत’ – अजित पवार

पुणे, ता. ०२/०८/२०२३: “राज्यातील युवकांचे, उद्योगधंद्यांचे, पाणी, शेती
आणि शेतकऱ्यांचे असे अनेक प्रश्न केंद्र सरकारशी संबंधित आहेत. ते मार्गी लागावेत, त्यासाठीचे पोषक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी मी भाजपसोबत गेलो, ‘ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी भाजपसोबत
सत्तेत सहभागी होण्यामागील कारण सांगितले. तसेच या संदर्भात प्रश्न विचारणारे पत्रकाराला तुला सकाळपासून कोणी दुसरे भेटला नाही का असे विचारत पवार संताप व्यक्त केला.

मुख्यमंत्रिपदाबदल विचारले असता, ‘सरकार चांगले चालले आहे, तर चालू दे,’ असे सांगत त्यांनी प्रश्नाला बगल दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये अजित पवार यांना सहभागी होऊ एक महिना होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारले असता, पवार म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच यापूर्वी मी अडीच वर्ष
काम केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मी विरोधी पक्षात काम केले. आमच्यात मतमतांतरे असतील, वैचारिक भूमिका वेगळी असेल, परंतु यापूर्वीच मी भूमिका स्पष्ट केली आहे. नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांत केलेले काम, त्यामुळे जागतिक पातळीवर भारताला लाभलेला मान, तसेच परदेशात त्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता त्यांच्याइतक्या क्षमतेची व्यक्ती आज तरी देशात दुसरी कोणी दिसत नाही. जे सत्य आहे, ते सत्यआहे.”

अजित पवार म्हणाले, “विरोधी पक्ष आंदोलन करू शकतो, टीका करू शकतो, परंतु निर्णय घेण्याचा अधिकार फक्त सत्ताधारी पक्षाला असतो. राज्याचे प्रश्न केंद्र सरकारकडून मार्गी लागावेत, यासाठीच मी सत्तेत गेलो आहे.”

…म्हणून समोरून जाणे टाळले!
टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद
पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात अजित पवार यांनी शरद पवार यांच्या समोरून जाणे टाळले. त्याबद्दल विचार असले असता, “मी साहेबांचा आदर करतो, म्हणून मागून गेलो,” असे सांगून यावर अधिक
बोलणे टाळले.