लक्ष्मण हाकेंच्या मागण्यांवर लेखी लिहून देणार का? छगन भुजबळ म्हणाले….

जालना, २२ जून २०२४: महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. एकाबाजूला मनोज जरांगे पाटील सग्या-सोयऱ्याच्या मुद्दावर ठाम आहेत. त्याचवेळी दुसऱ्याबाजूला लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आणि पुण्याला ससाणे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला १० दिवस झालेत. आज सरकारच शिष्टमंडळ हाके आणि ससाणे यांची वडोवद्री आणि पुण्यात भेटीसाठी येणार आहे. त्यावर छगन भुजबळ यांनी भूमिका मांडली.

मराठ्यांना कुणबीमधून ओबीसी आरक्षण देताना मूळ ओबीसी च्या आरक्षणाला धक्का लागण्याचा धोका आहे. म्हणून जालन्याच्या वडीग्रोदीमध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचं मागच्या दहा दिवसांपासून उपोषण सुरु आहे. आज त्यांनी उपोषण मागे घ्याव, यासाठी सरकारच शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी आलं आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार छगन भुजबळ सुद्धा आहेत. छत्रपती संभाजीनगर विमान तळावरुन वडीगोद्रीकडे जातान छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

भुजबळ म्हणाले, “काल मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री, जालन्याचे, पुण्याचे संबंधित कार्यकर्ते, वेगवेगळ्या संस्थांचे प्रमुख या सगळ्यांची बैठक झाली. यात काही मागण्या तिथेच मुख्यमंत्र्यांनी मंजूर केल्या. काही मागण्यांच्या बाबतीत अधिवेशन काळात ताबडतोत बैठक घेऊन, सर्व पक्षीय लोकांना बोलवून निर्णय घेण्यात येणार आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये अशी सरकारची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनी तसं स्पष्ट केलय, तोच निरोप घेऊन आम्ही आलो आहोत. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आणि पुण्याला ससाणे उपोषणाला बसले आहेत. १० दिवस झालेत, त्यांची प्रकृती ढासळत आहे. आम्ही सगळे त्यांना विनंती करायला आलो आहोत. तुम्ही सुद्धा चर्चेत सहभागी होऊन प्रश्न मार्गी लावावा. आत्मक्लेश न करता उपोषण सोडावं, हे सांगायला आलो आहोत” असं छगन भुजबळ म्हणाले.

‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही’
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे लक्ष्मण हाके यांनी लेखी मागितलय, त्यावर छगन भुजबळ यांनी, ‘आम्ही तिथे गेल्यावर सांगू’ असं उत्तर दिलं. तुमचं राजकीय करिअर उद्धवस्त करणार अशी धमकी देण्यात आलीय. त्यावर छगन भुजबळ म्हणाले की, “माझ राजकीय करिअर उद्धवस्त करणं, जनता जर्नादनाच्या हाती आहे. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही” हे उद्हारण त्यांनी दिलं.