देवेंद्र फडणवीस होणार पालकमंत्री ? 

पुणे, १९ जुलै २०२२: राज्यात नव्हे सर्कस स्थापन झाल्यानंतर त्यात उपमुख्यमंत्री पद वाट्याला आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आता पुणे जिल्ह्यावर कब्जा करण्यासाठी थेट पालकमंत्री पद घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पालकमंत्री पदाच्या आडून पुणे जिल्ह्यातील बारामती सह सर्व नगरपरिषदा, लोकसभा, विधानसभा मतदारसंघ, जिल्हा परिषद आणि पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका स्वतःच्या ताब्यात घेतला जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली

 

मुख्यमंत्री शिवसेनेचे आणि निधीवाटपाचे झुकते माप राष्ट्रवादीला या मुद्द्यावर शिवसेनेमध्ये असंतोष होता. त्यानंतर शिवसेना फुटली. त्या फुटीचा लाभ चतूर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. अर्थात ज्या मुद्द्यांवरुन ही फुट पडली त्याच कारणांचा आढावा नवे सरकार घेणार नाही असे होणारच नव्हते. पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या ८७५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याच्या प्रशासकीय मंजुरीचा आढावा घेवून या कामांना नव्या सरकारने स्थगिती दिली. या संपूर्ण निर्णयात स्वत: फडणवीस यांनी लक्ष घातल्याचे सांगण्यात आले. हे लक्ष घालणे म्हणजे बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला टार्गेट करणे, हाच फडणवीसांचा उद्देश असणार आहे. त्यामुळेच फडणवीस पुण्याचे पालकमंत्री म्हणूनच येण्याचे संकेत आहेत. ही माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगितली जात नसली किंवा त्याला दुजोरा दिला जात नसला तरी एक माजी अपक्ष माजी मंत्री तथा येत्या सरकारमध्येही कॅबिनेट मंत्रीपदी मिळण्याची शक्यता असलेल्याची माहिती एका आमदाराने दिली.

 

 

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीची सद्दी संपविण्यासाठी आगामी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे जिल्हा परिषद, जिह्यातील सहकारी साखर कारखाने, बारामतीसह सर्वच नगर परिषदा आणि सहकारातील सर्व निवडणुकांमध्ये तगडे आव्हान देण्याचा फडणवीसांचा प्रयत्न राहणार आहे. तसेच, शिवसेनेच्या मागणीनुसार १६ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांनी पाठविलेल्या नोटिशीविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. शिंदे गटाच्या या याचिकेवर २० तारखेला निकाल अपेक्षित आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठ उद्या (ता. २० जुलै) निर्णायक सुनावणी करणार आहे. या निकालाचा सरकारला दिलासा मिळताच मंत्रीमंडळ विस्तार होईल. त्याच दरम्यान पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय होणार असल्याचेही या आमदारांनी सांगितले.

 

 

रुपाली चाकणकरांबाबत विचार सुरू

 

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या राष्ट्रवादीच्या फायरब्रॅंड नेत्या आहेत. उद्याच्या राजकारणात त्या खडकवासला विधानसभा मतदार संघातून थेटपणे उतरण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे सध्या असलेले महिला आयोगाचे पद हे वैधानिक असले तरी एकतर त्यांनी किमान कालावधीत आपले पद स्वत:हून सोडावे, अशी परिस्थिती निर्माण करणे वा त्यांच्या इच्छेनुसार त्यांना थेट शिंदे गट वा भाजपमध्येच घेण्याच्या घडामोडीही होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.