कसबा विधानसभा मतदार संघाचा पुढचा आमदार कोण ?

पुणे, २४ डिसेंबर २०२२ : टिळक घराण्याचे स्वातंत्र्य युद्धात मोठे योगदान आहे मुक्ताताई टिळक या पक्षातीत नेत्या होत्या. १५ वर्षे त्या माझ्या सहकारी होत्या. कसबा विधानसभा मतदारसंघ पोट निवडणुकीत त्यांचे पती शैलेश टिळक अथवा पुत्र कुणाल टिळक यांना भाजपने आमदारकीचे तिकीट द्यावे बाकी पक्षाने बीन विरोध निवडणूक करावी , अशी विनंती महानगर पालिकेतील विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी व्यक्त केली.

पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या त्या भाजपच्या विद्यमान आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक (वय ५७) यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी दुपारी निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्या कर्करोगाने आजारी होत्या. काल शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कसबा विधानसभा पोटनिवडणूक लवकरच जाहीर होईल. त्या पार्श्वभूमीवर केसकर बोलत होते.

चार वेळा नगरसेविका राहिलेल्या मुक्ता टिळक या 2017 मध्ये पुण्याच्या महापौर झाल्या. त्यानंतर 2019 मध्ये त्या आमदार म्हणून विधानसभेत गेल्या. टिळक कुटुंबातील काही सदस्य हे काँग्रेस पक्षाशी संबंधित आहेत तर, मुक्ता टिळक यांचे कुटुंब भाजपशी पूर्वापार संबंध आहेत. यापूर्वी टिळक घराण्यातून रोहित टिळक यांनी दोन वेळा काँग्रेसकडून कसबा विधानसभा मतदारसंघाची विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभव सामोरे जावे लागले होते. 2019 ला ते निवडणुकीत उभे राहिले नाहीत मात्र भाजपने मुक्ता टिळक यांना उमेदवारी देऊन आमदार केले. जयंतराव टिळक यांच्यानंतर विधिमंडळात जाणाऱ्या टिळक घरातील दुसऱ्या सदस्य ठरल्या. आता मुक्ता टिळक यांच्या जीवनामुळे ही एक जागा रिक्त झाली असून पुढील सहा महिन्यात याची पोटनिवडणूक होईल. यावेळेस उमेदवार कोण हा प्रश्न आत्ताच उपस्थित झाला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात हेमंत रासने, गणेश बिडकर, धीरज घाटे हे इच्छुक उमेदवार आहेत. तसेच गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट या बापट यांच्या राजकीय वारसदार ठरणार असल्याने त्यांच्याही उमेदवारीचा दावा केला जात होता. आता मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने या जागेवर त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी अशी मागणी समोर आलेली आहे. आत्तापर्यंत राज्यात पोटनिवडणुकांमध्ये कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी न दिल्यास तेथे बिनविरोध निवडणूक होत नाही. त्यामुळे आता भाजप काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलेले आहे.