भाषण करता करता गडकरींना आली भोवळ, उपचारानंतर पुन्हा प्रचार सुरु
पुसद, २४ एप्रिल २०२४: केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना आज प्रचारसभेत अचानक भोवळ आली. यवतमाळ येथील पुसद येथे महायुतीची आज जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला संबोधित करत असतानाच त्यांना व्यासपीठावर भोवळ आली.
गेल्या काही दिवसांपासून पारा वाढला आहे. सूर्य आग ओकत असल्याने अंगाची लाहीलाही होतेय. अशाच तापलेल्या वातावरणात प्रचारसभाही सुरू आहेत. लोकसभेच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी सर्वपक्षीयांकडून जय्यत तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांची यवतमाळ जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्यासाठी पुसद येथे जाहीरसभा आयोजित करण्यात आली होती. भर उन्हात नितीन गडकरी बोलायला उभे राहिले. त्यांनी आपलं भाषण सुरू करताच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. यातच, त्यांना व्यासपीठावर भोवळ आली. भोवळ येताच त्यांना सावरण्यासाठी त्यांचे अंगरक्षक पुढे सरसावले. अंगरक्षकांनी त्यांना सावरलं आणि खुर्चीवर बसवलं. यावेळी पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
दरम्यान, त्यांच्यावर तत्काळ वैद्यकीय उपचार करण्यात आले. वैद्यकीय उपचारांनंतर त्यांची प्रकृती व्यवस्थित झाल्यावर त्यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली. देशात विकासाचे पर्व सुरू असून यामध्ये प्रत्येकाचं मत महत्त्वाचं आहे, असं नितीन गडकरी म्हणाले.
सभेत काय म्हणाले नितीन गडकरी?
विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील १० वर्षांच्या काळात देशभरात रस्ते-महामार्ग तसेच शिक्षण, स्वास्थ्य व अन्य क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कार्य झाले आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना ग्रामीण भागापर्यंत यशस्वीरीत्या पोहोचवल्या गेल्या. यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातील जनतेलाही अनेक महत्वपूर्ण सुविधांचा लाभ घेता येत आहे. सातत्याने विकासाची ओढ असलेली यवतमाळ जिल्ह्यातील जनता यावेळीही सर्वांगीण विकासाचा विश्वास देणाऱ्या भाजप-महायुतीला विजयी करेल असा मला विश्वास आहे, असं नितीन गडकरी म्हणाले.