पर्वती सोडून मी कुठे जाऊ? माधुरी मिसाळ
पुणे, १४ आॅक्टोबर २०२४ ः विधानसभा निवडणुकीमध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी आमदार माधुरी मिसाळ यांच्या समोर पक्षांतर्गत आव्हान निर्माण झालेले आहे. त्यावर मिसाळ यांनी भाष्य करत मी पर्वती मधूनच लढणार आहे. हा मतदारसंघ सोडून मी कुठे जाऊ? असा प्रश्न उपस्थित केला.
गेल्या पाच वर्षातील केलेल्या कामगिरीची माहिती देण्यासाठी मिसाळ यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. मिसाळ म्हणाल्या, गेल्या १५ वर्षापासून मी पर्वती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आले आहे. स्वारगेट उड्डाणपूल, सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल हे वाहतूक कोंडी कमी करणारे प्रकल्प मार्गी लावले. सिंहगड रस्त्यावरून खडकवासला ते हडपसर मेट्रो मार्गाला राज्य सरकारने मान्यता दिली. ही मेट्रो करता सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाची तोडफोड करावी लागणार नाही. पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्राम विकसित केले. यासह अनेक कामे केली गेली आहे. मी आमदार असेल किंवा नसेल पण या कामांमुळे माझी ओळख मतदारसंघात असणार आहे.
विधानसभेसाठी उमेदवारी मागावी यात काहीही चूक नाही, एकदा पक्षाने उमेदवार जाहीर केल्यानंतर सर्व काही व्यवस्थित होते. ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल त्याचे काम करणार. पर्वतीमध्ये जातीवर मतदान होत नाही, तेथे काम बघुनच मतदान होते.
पक्ष निर्णय घेईल
पर्वतीच्या तीन वेळा आमदार राहिलेल्या मिसाळ यांना मंत्रीपदाबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या, कामाचा आणि मंत्रिपदाचा काही संबंध नाही.पक्षाला जेव्हा योग्य वेळ वाटते तेव्हा मंत्री केले जाते. वेळेच्या आधी आणि नशिबाच्या पुढे काही मिळत नाही. मी पर्वती मतदारसंघातून निवडणूक लढणार असून, त्यासंदर्भातने सुरु असलेल्या चर्चेला काही अर्थ नाही, असेही मिसाळ म्हणाल्या.