दिशाहीन काँग्रेसचा उमेदवार विधानसभेत जाऊन काय करणार ? – चंद्रकांत पाटील
पुणे, २० फेब्रुवारी २०२३ ः काँग्रेस सारख्या दिशाहीन पक्षाचा उमेदवार विधानसभेत जाऊन काय करणार? पुण्यात मेट्रोचे जाळे वाढवायचे असेल, वाड्यांचा, गुंठेवारीचा प्रश्न पाठपुरावा करून सोडवायचा असले तर शिवसेना व भाजप महायुतीचे हेमंत रासने विधानसभेत हवे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीतील भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ नातू बाग मैदानावर ‘विजय संकल्प मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. उमेदवार रासने, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार संजय काकडे, माजी मंत्री दिलीप कांबळे, सुधाकर भालेराव, शैलेश टिळक, कुणाल टिळक, रिपाइचे परशुराम वाडेकर, लहूजी शक्ती सेनेचे विष्णू कसबे आदी यावेळी उपस्थित होते.
दुसऱ्या प्रचार सभेमुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मेळावा संपल्यानंतर कार्यक्रम स्थळी पोहचून शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत पाटील म्हणाले, विधानसभेत राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार लागतो. काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळाले नाही. महाविकास आघाडीत त्यांना विधानसभेत अध्यक्षपद सांभाळता आले नाहीत, उद्धव ठाकरे केवळ मुख्यमंत्रिपदावर खूष होते. या काळात केवळ राष्ट्रवादीने सत्ता भोगली. देशात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांपासून ते १८ राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत. राज्यात आपली सत्ता आहे. एवढी ताकद असताना कसब्यातून उमेदवार निवडून आला पाहिजे. हे धंगेकर कोण आहेत? रवींद्र धंगेकर यांना कायदा कशाने खातात हे तरी माहिती आहे का?, वाड्यांचा, गुंठेवारीचा प्रश्न मार्गा लावण्यासाठी, मेट्रोचे जाळे वाढविण्यासाठी हेमंत रासने विधानसभेत गेले पाहिजेत. धंगेकर माणूस चांगला पण ते तुमच्या समस्या सोडवू शकणार नाही.
शैलेश टिळक म्हणाले, ‘‘१९९१ च्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याचा दाखला काही जण देत आहेत. पण तेव्हाची स्थिती आणि आताची स्थिती पूर्ण वेगळी आहे. कुशल नेतृत्वातून गिरीश बापट यांनी हा मतदार संघ बांधला आहे. मुक्ता टिळक यांच्या कामाला न्याय द्यायचा असेल तर रासने यांना विजयी करा.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप