फडणवीसांकडून शिकण्याची इतकी वाईट वेळ आमच्यावर आली नाही – संजय राऊत यांचे प्रतिउत्तर
मुंबई, २५ मे २०२३: बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही व्यक्तींना विरोध केला नाही. काही भूमिकांना विरोध केला असेल. देवेंद्र फडणवीसांकडून बाळासाहेब शिकण्याची वाईट वेळ आमच्यावर अजून आलेली नाही”, अशा शब्दात ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.
नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा वाद एकीकडे वाढत असताना दुसरीकडे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केल्यावरून भाजपाकडून सातत्याने ठाकरे गटाला लक्ष्य केलं जात असताना त्यावरून आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “बाळासाहेबांनी ज्यांना आयुष्यभर विरोध केला, त्यांच्याशी उद्धव ठाकरेंनी आघाडी केली”, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केल्यानंतर त्यावरून आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना खोचक टोला लगावला आहे. “फडणवीसांना काहीही बोलू द्या. बाळासाहेबांनी कधीही व्यक्तींना विरोध केला नाही. काही भूमिकांना विरोध केला असेल. देवेंद्र फडणवीसांकडून बाळासाहेब शिकण्याची वाईट वेळ आमच्यावर अजून आलेली नाही”, असं संजय राऊत म्हणाले.
“देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या पक्षाविषयी बोलावं. बाळासाहेबांनी कधी बेईमानांना मांडीवर घेतलं नव्हतं. गद्दारांना लाथा घालून हाकलून द्या असं सांगितलं होतं. पण देवेंद्र फडणवीस काल गद्दारांच्या गाड्या चालवत होते. काय त्यांच्यावर वेळ आलीये ही”, असंही संजय राऊत म्हणाले.
“तुम्ही हिंदू आहात ना?”
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी ‘सापनात आणि नागनाथ एकत्र आले तरी मोदींचा पराभव करू शकणार नाहीत’ अशी टीका केल्याबद्दल पत्रकारांनी विचारणा केली असता त्यावरूनही संजय राऊतांनी टीका केली आहे. “सापनाथ आणि नागनाथाची इथे लोक पूजा करतात. तुम्ही हिंदू आहात ना? आपल्या देशात सापनाथ आणि नागनाथांची पूजा केली जाते. तुम्हाला त्यात त्रास व्हायचं कारण काय?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.