‘तू कधी मरशील माहिती नाही’ – भाजप शहराध्यक्ष घाटेंबद्दल काँग्रेसच्या शिंदेंचे वादग्रस्त विधान

पुणे, ३ जुलै २०२४: लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी हिंदूबद्दल केलेल्या विधानामुळे भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. पुणे शहरात भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करणारे फ्लेक्स उभारले आहेत. अनेक चौकांमध्ये लावण्यात आलेल्या या फ्लेक्सवर राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर फुली मारलेली असून बाजूला स्वामी विवेकानंद यांच्या फोटोसह “खबरदार हिंदू धर्माला नावे ठेवाल तर समुद्रात फेकून देईल” असा मजकूर छापण्यात आला आहे. याच पोस्टरवरून घाटे यांना प्रत्युत्तर देताना काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.

“भाजप अध्यक्ष स्वतः पोलीस संरक्षण घेऊन फिरतात. त्यांचा मर्डर करणार होते, तुझं वागणं नेमकं काय आहे हे त्यांना विचारा. तू एकटा फिरू शकत नाही. कधी तू मरशील हे माहित नाही. भाजपचे सर्व लोक बॉडीगार्ड घेऊन फिरतात, कारण यांचे कर्मच तशी केली आहेत” असे वादग्रस्त विधान अरविंद शिंदे यांनी केल आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष मनोहर भिडे गुरुजी यांनी स्त्रियांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिंदे माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, हिंदूंच्या नावावर हिंसा केली जाते, लोकांना भीती घातली जाते ते लोक हिंदू नाहीत. खरा हिंदू असे कधीच करत नाही हे राहुल गांधी म्हणाले. भारतीय जनता पक्षाकडे कोणताही मुद्दा नसल्याने शब्द फिरवून वेगळे नरेटीव्ह तयार केले जात आहे. तिनके को डुबने का सहारा असा प्रकार चालला असून हिंदू कधीही अत्याचार करत नाही, इतर समाजाचा आदर करतो हेच राहुल गांधी म्हणाले, असल्याचं देखील अरविंद शिंदे म्हणाले आहे.