राष्ट्रवादी काँग्रेस अजून किती दिवस आमच्यासोबत आहे माहीत नाही – पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

मुंबई, २ मे २०२३: एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांनी राजीनामा दिल्याने गोंधळ निर्माण झालेला असतातना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी अजून तरी आमच्यासोबत आहेत. परंतु आणखी किती दिवस आमच्यासोबत राहतील हे माहिती नाही. कारण भाजपासोबत त्यांची रोज बोलणी सुरू आहे, असा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

पृथ्वीराज चव्हाण हे कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी बोलत असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीची भाजपासोबत बोलणी सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आमच्यासोबत किती दिवस राहील हे माहिती नाही, असं वक्तव्य चव्हाण यांनी केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

अलिकडे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांबद्दल वेगवेगळे दावे केले जात होते. अजित पवार लवकरच काही आमदारांना घेऊन भाजपाशी हातमिळवणी करतील, अशा शक्यता शिंदे गटाचे आमदार सातत्याने व्यक्त करत आहेत. अशातच आता राष्ट्रवादीच्या आघाडीतला सहकारी असलेल्या काँग्रेसच्या नेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, काँग्रेसच्या मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कर्नाटकात भाजपाला विजय मिळणार नाही, ही बाब निश्चित आहे. त्यामुळे जेडीएसला रसद पुरवण्याचं काम भाजपाकडून केलं जात आहे. अशातच राष्ट्रवादीनेही कर्नाटकात काँग्रेसविरोधात उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी अजून तरी आमच्यासोबत आहेत. परंतु आणखी किती दिवस आमच्यासोबत राहतील हे माहिती नाही. कारण भाजपासोबत त्यांची रोज बोलणी सुरू आहे.

चव्हाण म्हणाले, रोज बातम्या येतात, कोणता नेता जाणार आणि कोण थांबणार. त्यांनी काय निर्णय घ्यायचा हे त्यांचं ते बघतील. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाला आहे. त्यामुळे इतर राज्यात जाऊन मतांची टक्केवारी वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळेल यासाठी मतांची टक्केवरी वाढवण्याकरता ते निवडणूक लढतायत. परंतु भजपाची टक्केवारी वेगळी आणि राष्ट्रवादीची टक्केवारी वेगळी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला तुम्ही फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप