‘आम्ही निवडणुकीसाठी तयार पण न्यायालयामुळे निवडणुकीवर स्थगिती’

मुंबई, ४ ऑगस्ट २०२३ : विरोधकांकडून निवडणूक घेण्याचे आव्हान देण्यात येत आहे. मात्र, निवडणूक घेण्याचा अधिकार राज्य सरकारला नसल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये दिली. आम्हालाही निवडणूक हवी आहे, आम्ही निवडणुकीसाठी तयार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईत शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी एक एक काय फोडता हिंमत असेल तर निवडणुका घ्याच असे आव्हानच भाजपला दिले होते. त्यानंतर आज विधानपरिषदेत फडणवीस यांनी आम्हालाही निवडणुका हव्या आहेत. त्यासाठी आम्ही सुद्धा तयारच आहोत असे सांगितले. त्यांचे हे वक्तव्य उद्धव ठाकरेंना प्रतिआव्हान म्हणून पाहिले जात आहे.

ते पुढे म्हणाले, मुंबई महापालिका निवडणुका घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाचा आहे. निवडणूक आयोगाने 4 ऑगस्ट 2022 रोजी निवडणूक प्रक्रिया थांबविण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. त्यामुळे यामध्ये राज्य सरकार काहीच करू शकत नाही. वॉर्डांची जी केस आहे ती वेगळी असून त्यात स्टे नाही. मुळात आरक्षणाची जी केस होती त्यात अनेक केस टॅग झाल्या. या केसचा निकाल लागेपर्यंत कोणतीच निवडणूक घेऊ नये असे सांगितले आहे.

यानंतर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी आक्षेप घेतला. त्यावर फडणवीस म्हणाले, मी अत्यंत जाणीवपूर्वक सांगतो की आम्हालाही निवडणुका हव्या आहेत. आम्हीही तयारीत आहोत. परंतु, सुप्रीम कोर्टाच्या पुढे आपण नाही. तरीही आपल्याला वाटत असेल तर निवडणूक आयोग स्वायत्त आहे. आपण जरूर आयोगाकडे जाऊन माहिती घ्या. त्यांना विचारा. जर नसेल तर आपण सगळे एकत्रित जाऊ आणि त्यांना काय अडचण आहे ते विचारू, यावर सभागृहात उपस्थित सदस्यांनी त्यास अनुमोदन दिले.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप