भ्रष्टाचाराचा आरोप होताच वरुण सरदेसाईंची सारवासारव; भाजपच्या आरोपात तथ्य नाही
पुणे, ३१ डिसेंबर २०२२: “भाजपने विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध नीच आणि घाणेरडेपणाचे राजकारण सुरू केले आहे. विधिमंडळ सभागृहात भाजपचे आमदार योगेश सागर यांनी केलेल्या आरोपात काडीमात्र तथ्य नाही. त्यांनी सभागृहाच्या बाहेर आरोप केल्यास त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करू,” असा इशारा युवासेनचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव वरूण सरदेसाई यांनी दिला.
भाजप आमदार योगेश सागर यांनी विधिमंडळात अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केला होता. या संदर्भात सरदेसाई यांनी पुण्यातील शिवसेना शहर कार्यालयात शनिवारी पत्रकार परिषद घेऊन सागर यांनी केलेले आरोप खोडून काढले. सरदेसाई म्हणाले, “भाजपचे आमदार सागर यांनी केलेल्या आरोपात काडीमात्र तथ्य नाही. हिंदुस्तान स्काऊट्स अँड गाईड या संस्थेला केंद्र आणि राज्य सरकारची मान्यता असून, आपत्कालीन परिस्थितीत मदत व पुनर्वसनाचे काम करणारी ही संस्था आहे. या संस्थेला मान्यताच नाही, असा केलेला आरोप खोटा आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती होऊन केवळ सव्वा वर्ष झाले असून, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचा एकच कॅम्प घेता आला. कोणत्याही विद्यार्थ्याकडून पैसे गोळा केले नाहीत. अशा एकाही विद्यार्थ्याला मी ओळखत नाही किंवा त्यांच्याशी कोणताही संबंध आलेला नाही. देशात भारत स्काऊट अँड गाईड आणि हिंदुस्थान स्काऊट अँड गाईड अशा दोनच मान्यताप्राप्त संस्था आहेत. इतर कोणत्या संस्थेने असा गैरप्रकार केला असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.”
आमदार सागर यांनी केलेल्या आरोपात ‘हिंदुस्थान स्कॉऊट अँड गाईड्स’ ही शासनमान्य संस्था असल्याचे भासवत तरुणांना या संस्थेद्वारे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणानंतर शाळांमध्ये स्कॉऊट अँड गाईडचे शिक्षक म्हणून भरती करण्यात येईल, असे आश्वासन तरुणांना या संस्थेद्वारे दिले जाते. याबदल्यात तरुणांकडून या संस्थेचे अध्यक्ष सरदेसाई यांनी प्रत्येकी दहा लाख रुपये घेतल्याचे म्हटले होते. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.