उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी
मुंबई, २५ एप्रिल २०२४ ः मुंबईमधील सहा लोकसभा मतदारसंघापैकी काही मतदारसंघाचा तिढा गेले काही दिवस महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये दिसत होता. त्यापैकीच एक असलेल्या मुंबई उत्तर मध्य लोकसभेसाठी आता काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन सलग दोन वेळा निवडून आल्या होत्या. मात्र यावेळी त्यांच्या उमेदवारीबाबत भाजपाकडून मौन बाळगण्यात आले आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार पूनम महाजन यांनी २०१४ व २०१९ मध्ये दोन वेळा विजय मिळवला. मात्र वरिष्ठांची नाराजी, पक्षांतर्गत वाद, तक्रारी आणि सर्वेक्षण अहवाल आदी कारणांमुळे महाजन यांना उमेदवारी घोषित होऊ शकलेली नाही. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीसाठी अनेकदा आग्रह करूनही त्यांनी आपल्याला रस नसल्याचे वरिष्ठ नेत्यांना सांगितले आहे. त्यामुळे भाजपाने अद्याप या मतदारसंघात कुणाचीही उमेदवारी जाहीर केलेली नाही.
सुरुवातीला काँग्रेसकडून माजी आमदार नसीम खान यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात ख्रिश्चन आणि मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे ही मते वळविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे बोलले जात होते. मात्र आता वर्षा गायकवाड यांचे नाव जाहीर झाल्यानंतर उमेदवाराबाबतचे चित्र स्पष्ट झाले आहे.
मुंबईतल्या सहा मतदारसंघांपैकी ४ मतदारसंघ ठाकरे गटाला तर २ मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आले आहेत. यानुसार उत्तर-मध्य मुंबई व उत्तर मुंबई या जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. तर ठाकरे गटाला दक्षिण मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई आणि ईशान्य मुंबई असे चार मतदारसंघ मिळाले आहेत. वर्षा गायकवाड यांनी मुंबईबाबत झालेल्या जागावाटपावर नाराजी व्यक्त केली होती. मुंबईत काँग्रेसला ३ जागा मिळायला हव्या होत्या, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड इच्छुक होत्या. परंतु, या जागेवरून महाविकास आघाडीत मतभेद झाले. हा मतदारसंघ ठाकरे गटाला मिळाला आणि तिथून अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर झाली. यावरून शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा यांनी उबाठा गटावर निशाणा साधला होता. ते म्हणाले, “दक्षिण मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांना तिकीट न देणे यातून काँग्रेस आणि उबाठा गटाची दलित विरोधी मानसिकता दिसून येते.”