उद्धव ठाकरेंचे राईट हॅन्ड मिलिंद नार्वेकर विधान परिषदेच्या रिंगणात, ११ जागांसाठी आले १४ अर्ज
मुंबई, ३ जुलै २०२४ : लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्याआधी राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा आहे. या निवडणुकीत आता चुरस वाढू लागली आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ठाकरे गटाचे मिलींद नार्वेकर यांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. आज उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर ५ जुलैपर्यंत अर्ज माघारीसाठी मुदत आहे. या मुदतनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काल अखेरचा दिवस होता. निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरू होता. नंतर मात्र ठाकरे गटाकडून मिलींद नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता निवडणूक होणार असल्याचे सांगितले जात आहे. या व्यतिरिक्त आणखी दोन अपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत. आज या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्रुटी राहिलेले अर्ज बाद होतील. यानंतर अर्ज माघारी घेण्यासाठी ५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
या मुदतीनंतर निवडणूक होणार की बिनविरोध होणार याचं उत्तर मिळणार आहे. विधानपरिषदेच्या ११ आमदारांचा कार्यकाळ २७ जुलैला संपणार आहे. या रिक्त जागांसाठी १२ जुलैला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप पाच, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या प्रत्येकी दोन तसेच काँग्रेस, ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येकी एका उमेदवाराने काल अर्ज दाखल केले.
महाविकास आघाडीकडून सुरुवातीला दोन जागा लढण्याचे ठरले होते. एका जागी काँग्रेस आणि एका जागेवर शरद पवार गट आणि ठाकरे गट शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देतील असे नियोजन होते. परंतु, ठाकरे गटाने तिसरा उमेदवार देऊन निवडणुकीत मोठा ट्विस्ट आणला. ठाकरे गटाच्या या खेळीने निवडणुकीची गणितेच बदलली आहेत. शिंदे गट आणि अजित पवार गट सावध झाला आहे.
शिंदेंनी घेतली आमदारांची बैठक
विधानपरिषद निवडणुकीत घडत असलेल्या या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांची काल बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आमदारांचे कान टोचले. या निवडणुकीत महायुतीचे ९ उमेदवार निवडून आणायचे आहेत तेव्हा कामाला लागा. आपसात मतभेद होऊ देऊ नका अशा सूचना शिंदेंनी दिल्या.
‘त्या’ संख्येने वाढणार महायुतीचं टेन्शन
या निवडणुकीत महायुतीचे ९ आणि महाविकास आघाडीचे ३ उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभेतील संख्याबळ पाहिलं तर महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येऊ शकतात. तर मविआचे मात्र दोनच उमेदवार निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीनंतरच्या घडामोडी पाहिल्या तर महायुतीत अविश्वासाचं वातावरण तयार होताना दिसत आहे. शिंदे गटाचे आमदार ठाकरे गटाच्या तर अजित पवार गटाचे आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.
या निवडणुकीत तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीला फक्त ५ ते ६ आमदारांची गरज आहे. मग अशा परिस्थितीत काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.