उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला दिली महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची धमकी
मुंबई, १५ जुलै २०२४ : महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीने महाविकास आघाडीतील राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे काँग्रेस आमदारांच्या मतांच्या पाठिंब्याने आरामात विजयी झाले असले तरी मतदानाच्या दिवसापूर्वी काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये पडद्यामागे मोठा वाद झाला. नार्वेकरांचा पराभव झाल्यास महाविकास आघाडीतून आम्ही बाहेर पडू असा इशारा उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला दिला. तर दुसरीकडे शरद पवार यांनी ठाकरे यांना वारंवार फोन करुनही त्यास प्रतिसाद दिला नाही.
न बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आहेत.
विधानपरिषद निकालानुसार, ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी पहिल्या पसंतीच्या २२ मतांनी विजय मिळवला होता, ज्यात काँग्रेसची ७ आणि ठाकरेंच्या शिवसेनेची १५ आणि एक अपक्ष आमदार होता. खरं तर काँग्रेसची ही ७ मतं मिळवण्यासाठी ठाकरेंना खूप संघर्ष करावा लागला होता. कारण ठाकरेंना पाठिंब्यासाठी काँग्रेसने ज्या आमदारांचा प्रस्ताव दिला होता. त्या आमदारांची मतं फुटण्याची भीती होती. यामध्ये मोहनराव हंबर्डे, हिरामणी खोसकर, सुलभा खोडके, कुणाल पाटील आणि शिरीष चौधरी या काँग्रेस आमदारांच्या नावांचा समावेश होता. या आमदारांची मतं फुटण्याची ठाकरेंना भीती होती.
राजकीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरं तर ठाकरेंचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पाठिंबा द्यायचा की शेतकरी आणि कामगार पक्षाचे (पीडब्ल्यूपी) नेते जयंत पाटील यांना पाठिंबा द्यायचा, यावरून काँग्रेस नेत्यांमध्ये दोन गट पडले होते. पृथ्वीराज चव्हाण, बंटी पाटील, नसीम खान आणि नाना पटोले यांनी ठाकरेंना आवश्यक सात मतांचा पाठिंबा देण्याची तयारी होती, तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात हे शरद पवारांचे उमेदवार जयंत पाटलांच्या बाजूने मतं देण्याच्या भूमिकेत होते. ज्यामुळे ठाकरेंच्या उमेदवाराला मोठा धोका निर्माण झाला होता.
ठाकरेंचे नेते अनिल देसाई, विनायक राऊत आणि वरुण सरदेसाई यांनी काँग्रेसने सुरुवातीला दिलेल्या आमदारांच्या पाठिंब्याच्या नावाच्या प्रस्तावाला विरोध केला होता.याउलट ठाकरेंच्या सेनेने पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, ऋतुराज पाटील, अमित देशमुख, धीरज देशमुख आणि अस्लम शेख या आठ नावांची यादी दिली होती.
यानंतर १२ जुलै रोजी मतदानाच्या आदल्या रात्री इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेनिथला आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर प्रदेश काँग्रेस नेतृत्वाने प्रस्तावित केलेल्या नावांमध्ये बदल करण्यात आला. अखेरीस नाना पटोले, के.सी. पाडवी, सुरेश वरपुडकर, शिरीष चौधरी, सहस्राम कोरोटे, मोहनराव हंबर्डे आणि हिरामण खोसकर या सात नावांवर यूबीटी सेनेच्या समर्थनार्थ प्रस्ताव अंतिम करण्यात आला.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह नृपाल पाटील आणि शरद पवार समर्थक उमेदवार जयंत पाटील यांचे पुत्र व पुतणे निनाद पाटील यांनी रात्री उशिरा बैठकीत घुसले.यावेळी निनाद पाटील यांनी ठाकरे सेनेचे नेते अनिल देसाई यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केली. ठाकरेंची सेना त्यांचे काका जयंत पाटील यांच्या विरोधात कट रचत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे विधानपरिषद निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत तीव्र संघर्ष निर्माण झाला.
इतकचं नाही तर उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीचा निकाल त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात गेल्यास महाविकास आघाडी सोडण्याची धमकी दिली, अशी सूत्रांनी माहिती आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांनी एमएलसी निवडणुकीच्या मतदानाच्या दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेक फोन केले होते. मात्र उद्धव ठाकरे त्यांच्यासाठी अनुपलब्ध राहिले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान आता निकाल लागले आहेत आणि ठाकरे सेनेचा उमेदवार पहिल्या पसंतीच्या २२ मतांनी विजयी झाला आहे. त्यांना २३ मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी एका मताची आवश्यकता होती. पण तरी जर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने आश्वासन देऊन देखीलही दोन आमदारांनी क्रॉस वोटींग केली असती तर ठाकरेंचा उमेदवार पडला असता. पण अखेरीस, काँग्रेस प्रदेश नेतृत्व देखील त्यांच्या असंतुष्ट आमदारांचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरले ज्यामुळे क्रॉस व्होटिंग आणि एमएलसी निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव झाला.