देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रिपद उद्धव ठाकरे यांनी चोरले – चंद्रशेखर बावनकुळे

यवतमाळ, २३ जून २०२३ : देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रिपद उद्धव ठाकरे यांनी चोरले. पुत्रप्रेमात ते धृतराष्ट्राप्रमाणे आंधळे झाल्याने त्यांचे ५० आमदार सोडून गेले हेदेखील त्यांना माहिती नव्हते. येत्या काळात त्यांच्या पक्षाच्या मंचावर केवळ चारच चेहरे दिसतील, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

बाभुळगाव येथे गुरुवारी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आ. मदन येरावार, यवतमाळ भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भूतडा, जिल्हा संघटन सरचिटणीस राजू पडगिलवार, डॉ. आशिष देशमुख आदी उपस्थित होते.
२०३५ पर्यंत मोदींच्या नेतृत्त्वात भारत आत्मनिर्भर होईल, असे यावेळी बावनकुळे म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील देशाची सत्ता आणि सरकार सर्वसामान्य लोकांच्या विकासाचे साधन झाले आहे, असे ते म्हणाले.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला उद्धव ठाकरे यांचे नेतृत्त्व मान्य नसल्याने महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला तडा पडला आहे. शरद पवारांनीदेखील त्यांच्या आत्मचरित्रातून ठाकरेंच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले. महाविकास आघाडीमध्ये आठ लोक मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ३-३ तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेदेखील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे, असेही बावनकुळे म्हणाले.