नरेंद्र मोदींच्या जवळ गेलेल्या अजित पवारांची उद्धव ठाकरे यांनी घेतली भेट

मुंबई, १९ जुलै २०२३: राष्ट्रवादी कॉंग्रसमध्ये फुट पडल्यानंतर आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याशी अजित पवार यांचे चांगले संबंध निर्माण झालेले असताना ठाकरे यांनी पवारांचे कौतूक करत अन्य केल्याने राजकीय अर्थ काढले जात आहेत.

आज उद्धव ठाकरे विधानभवन परिसरात आले होते. त्यांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, सोमवारी आणि मंगळवारी बेंगळुरूमध्ये लोकशाहीप्रेमी आणि देशप्रेमी पक्षांची पक्षांची बैठक झाली. या पक्षांची एक आघाडी स्थापन झाली. ही इंडिया नावाची आघाडी एका कोणत्याही पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या विरोधातली लढाई नाही. तर ही लढाई हुकूमशाहीच्या विरोधात आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री या पदांवर लोक येतात आणि जातात. पण जो पायंडा पडतो, तो घातक आहे. त्याविरोधात देशप्रेमी आणि लोकप्रेमी लोक एकत्र आल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

अजित पवारांच्या भेट घेतली, त्या भेटीत काय झालं? असा प्रश्न विचारताच ठाकरे म्हणाले की, अजित पवारांना त्यांनी चांगलं काम कराव, अशा शुभेच्छा दिल्या. राज्यात सध्या जी काही सत्तेची साठमारी सुरू आहे, त्यात राज्यातील महत्त्वाचे पश्न आहेत. पाऊस सुरू झाला आहे, पूरस्थिती आहे. पावसाअभावी शेतकरी चिंतेत होता, आता अतिवृष्टीमुळे शेतकरी चिंतेत सापडण्याची शक्यता आहे. अशात जो मुळ शेतकरी आणि राज्यातील नागरिक आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका, अशी विनंतीही मी अजित पवारांना केल्याचं ठाकरेंनी सांगितलं.

यावेळी ठाकरेंनी अजित पवारांचं कौतुकही केलं. ते म्हणाले, अजित पवार हे अडीच वर्षे माझ्यासोबत होते. त्यांच्या कामाची पद्धत माहित असल्यानं मला खात्री आहे की, सत्तेचे डावपेच इतर लोकांकडून सुरू असले तरीही अजित पवारांकडून जनेतला मदत होईल. जनतेला योग्य न्याय मिळेल. कारण, राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे दिल्या गेल्या आहेत. त्यामुळं हे शक्य आहे, असंही ठाकरे म्हणाले.

अजित पवार निधी देत नाहीत म्हणून शिवसेनेचे आमदार मविआतून बाहेर पडले. आज तेच आमदार अजित पवारांसोबत सत्तेत आहे. याविषयी विचारलं असता ठाकरे म्हणाले की, हे सगळं जनतेला समजतं आहे. हा डोळा नसलेला धृतराष्ट्र नाही, तर हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, असं म्हणत ठाकरेंनी शिंदे गटाला इशारा दिला.