शरद पवार यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन उद्धव ठाकरे बिघडले – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे टीका

मुंबई, २४ ऑक्टोबर २०२३: उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या रुग्णालयात गेल्याने त्यांना विस्मृतीचा आजार जडला आहे. उद्धव ठाकरेंचं भाषण हे इंडिया आघाडीच्या प्रवक्त्याचं भाषण होतं असं म्हणत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे. तसंच उदयनिधी स्टॅलिनवर ते का बोलत नाहीत असाही प्रश्न बावनकुळेंनी विचारला आहे. उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात जे भाषण केलं त्यात त्यांनी भाजपा हा विघ्नसंतोषी पक्ष असल्याचं म्हटलं होतं. आता याबाबत विचारलं असता चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

“उद्धव ठाकरे यांच्याकडे काही मुद्देच उरलेले नाहीत. त्यामुळे ते लोकांची दिशाभूल करत आहेत. लोकांना दिशा देता आली नाही की दिशाभूल करायची हेच त्यांच्या भाषणातून दिसलं. अडीच वर्षे जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा विकास साधला नाही. त्यामुळे विकासाचा मुद्दाही त्यांच्याकडे नाही. विकासाचा अजेंडा संपतो आणि व्हिजनलेस व्यक्ती राजकारणात असतो तेव्हा दिशाभूल करण्याचं काम करतो. जनसंघ स्वातंत्र्य लढ्यात नव्हता वगैरे वगैरे ते बोलतात. इतके दिवस त्यांचा पक्ष आणि आमचा पक्ष एकाच विचारधारेवर काम करत होता. मात्र उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बिघडले आहेत. त्यामुळे त्यांना जुनं काही आठवत नाही. त्यांना विस्मृतीचा आजार जडला आहे.”

४० वर्षे संघाचे विचार, संघ किती श्रेष्ठ आहे. आपला संस्कार कसे श्रेष्ठ आहेत हे सांगणारे उद्धव ठाकरे आता काँग्रेस कशी चांगली? राहुल गांधी किती चांगले, शरद पवार किती चांगले हे सांगत आहेत. उदयनिधी स्टॅलिन कसे चांगले आहेत हे सांगत आहेत. उद्धव ठाकरेंचं दसऱ्याचं भाषण हे इंडिया आघाडीच्या प्रवक्त्याचं भाषण होतं. एकनाथ शिंदे सरकारने, मोदी सरकारने जो काही विकास घडवला त्यावर ते बोलणार नाहीत हे माहित होतंच. सोन्याच्या चमच्याने बदामाचा ज्यूस प्यायलेले नेते म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. यांना काहीही समस्या समजत नाहीत. गरीबांचं कल्याण, त्याविषयीच्या योजना काही समजत नाही. त्यामुळे ते देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ते टीका करत आहेत. अशीच भाषणं ते करणार आहेत, त्यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

“आज जे जमले आहेत तिकडे ते आमच्यावर टीका करतील त्यांना मी किंमत देत नाही. जातीपातीच्या भिंती उभ्या करुन सगळ्यांना आपसांत लढवण्याचं काम जे भाजपा करतं आहे ते आपल्याला मोडून काढायचं आहे. ज्यांच्याशी आपण लढतो आहोत तो (भाजपा) कपटी आहे. भाजपा इतका विघ्नसंतोषी आहे की कुणाचंही लग्न असो हे जाणार पंगतीत बसणार, भरपूर जेवणार, आडवा हात मारणार. श्रीखंड पुरी, बासुंदी, ३५ पुरणपोळ्या खाणार, सगळ्या पुरणपोळ्या फस्त करुन ढेकर देणार. पण लग्नातून निघताना नवरा बायकोत भांडण लावून निघणार असली ही (भाजपा) अवलाद आहे.

मी परत एकदा सांगतो भाजपा असो किंवा त्याकाळातला जनसंघ असेल यांचा कुठल्याही लढ्याशी संबंध नव्हता. स्वातंत्र्य लढ्यात ते नव्हते, मराठवाडा मुक्तीसंग्रामात त्यांचं नाव ऐकलं नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही ते नव्हते. पण केव्हा एकत्र आले? संयुक्त महाराष्ट्र समितीत आले. कशासाठी आले? आयतं अन्न शिजतंय चला हात मारु म्हणून आले. सगळ्यात शेवटी हे आले आणि सर्वात आधी बाहेर पडले. जागावाटपाचं भांडण त्यावेळी त्यांनी केलं. विघ्नसंतोषीपण म्हणतात तो यालाच.” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्याला आता बावनकुळेंनी उत्तर दिलं आहे.