काँग्रेसच्या उमेदवारासाठी आणखीन तीन दिवसाचे प्रतीक्षा

पुणे, १४ मार्च २०२४ : भाजपने पुणे लोकसभा मतदार संघासाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची घोषणा केली त्यानंतर आता काँग्रेसकडून मोहन जोशी किंवा आमदार रवींद्र धंगेकर यांच्यापैकी कोणाला उमेदवारी दिली जाईल याचे तर्कवितर्क लढविले जात आहेत. या दोन्ही इच्छुक उमेदवारांनी वैयक्तिक प्रचार सुरू केलेला असला तरी काँग्रेसचा उमेदवार जाहीर होण्यास आणखीन किमान तीन दिवसांचा तरी कालावधी लागू शकतो अशी माहिती काँग्रेसमध्ये सूत्रांनी दिली.

राहुल गांधी यांची ईशान्य भारतातून सुरू झालेली भारत जवळ न्याय यात्रा दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रात आली. नंदुरबार येथे त्यांची सभा झाल्यानंतर आज नाशिक येथे सभा पार पडली यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे देखील उपस्थित होते. मुंबई येथे या यात्रेचा समारोप होणार असून १६ मार्च रोजी त्यांची सभा होणार आहे. त्यामुळे काँग्रेसची सर्व यंत्रणा राहुल गांधी यांची स्वागत करण्यासाठी व्यस्त आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांच्या यात्रेचा समारोप होण्यापूर्वी उमेदवारांचे नावांची घोषणा केल्यास त्यातून मान अपमान नाट्य होण्याची शक्यता आहे. नाराज झालेले काँग्रेसचे इच्छुक उमेदवार यावेळी बंडखोरी करून विरोधी पक्षांमध्ये देखील सहभागी होऊ शकतात. राहुल गांधी महाराष्ट्र मध्ये असताना पक्षावर बंडखोरी रोखण्याची नामुष्की येऊ नये यासाठी उमेदवारांची घोषणा करण्याची टाळलेले आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातून आमदार रवींद्र धंगेकर, मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी विरोधी पक्षनेते आबा बागुल यांच्यासह अर्धा डझन इच्छुक आहेत. यापैकी कोणत्या नावावर शिक्का मुहूर्त होणार याकडे लक्ष लागलेले आहे. भाजपने मुरलीधर मोहोळ यांच्या रूपात मराठा उमेदवाराला निवडणूक लढविण्याची संधी दिली आहे. असे असताना काँग्रेस ब्राह्मण, ओबीसी, मराठा उमेदवार निवडणुकीत उतरवणार याकडे लक्ष लागलेले आहे
१७ मार्च रोजी पुण्यातील उमेदवारांची यादी जाहीर होऊ शकते असे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले आहे.