महायुतीत उडणार खटके, धनंजय मुंडेंच्या पालकमंत्रीपदाला शिंदेसेनेच्या मंत्र्याचा विरोध
छत्रपती संभाजीनगर, २७ डिसेंबर २०२४ : बीडमध्ये सरपंच हत्या प्रकरणामुळे अत्यंत तणावाचं वातावरण आहे. महायुतीत देखील खटके उडाल्याचं चित्र आहे. अशातच मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यात पालकमंत्रिपदाचे वेध लागलेले आहेत. महायुतीमध्ये पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं दिसत आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा मंत्री धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्रिपद देण्यास विरोध आहे.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव आलंय. त्यामुळे राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे टार्गेटवर आहेत. सध्या तर त्यांना महायुतीतूनच विरोध होताना दिसतोय. धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रिपद देवू नका, अशी थेट मागणी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलंय. शिरसाट यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही भूमिका मांडलीय. त्यामुळे नवा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
संजय शिरसाट म्हणाले की, राज्यातील सरपंच खतरे में है, अशातला भाग नाहीये. पण सरपंचाने जबाबादारी चांगली केली, तर दुश्मन उभे राहतात. सरपंच हत्या प्रकरणानंतर त्यांच्याप्रती असलेली सहानुभूती संपूर्ण जिल्ह्यात दिसली. कल्याणमध्ये देखील काल आमदाराच्या खूनाचा प्रयत्न करण्यात आलाय. याकडे राजकीय दृष्टीने पाहू नका. तसेच धनंजय मुंडेंना पालकमंत्री करू नका, अशी मागणी देखील संजय शिरसाट यांनी केलीय.
मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय द्या, अशी मागणी केलीय. यावरून संजय शिरसाट यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. शिरसाट म्हणाले की, धनंजय मुंडे सत्तेत राहाता कामा नये, असं म्हणणारे देखील काहीही बोलतील. परंतु मुख्यमंत्री यावर निर्णय घेतील. त्याचसोबत महायुतीमध्ये तणाव नसल्याचं देखील शिरसाट म्हणाले. परंतु हा संवेदनशील पद्धतीने हा विषय हाताळण्याची गरज असल्याचं देखील शिरसाट म्हणाले आहेत.
संजय शिरसाट यांनी सांगितलं की, मी स्वतः बीडमधील परिस्थिती पाहिली आहे. तेथील जातीय तणाव वाढलाय. हल्ले होण्याची शक्यता जास्त आहे. तक्रार असलेले अधिकारी बदलायला हवेत, असं पोलीस अधिक्षकांना सांगितलं आहे. तपासात अडथळे येत आहेत. अधिकारी माझ्या मर्जीतला आहे, असा विश्वास गुंडांना झालाय. त्यामुळे यंत्रणेची चांगली साफसफाई करून चांगले अधिकारी बीडमध्ये पाठवायला हवे. वाळू माफिया, गुंडांची चैन सुरू असल्याचा आरोप देखील संजय शिरसाट यांनी केलाय.