मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर आताच गरज नाही: शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव धुडकावला

पुणे, २३ ऑगस्ट २०२४: राज्यात निवडणुका जवळ आलेल्या असताना राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या घडामोडींत राज्याच्या मुख्यमंत्रिदाचा चेहरा कोण असेल हा प्रश्न जरा जास्तच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा त्याला माझा पाठिंबा असेल असे वक्तव्य केले होते. मात्र काँग्रेस आणि शरद पवार गट या मुद्द्यावर उदासीन आहेत. शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा या मुद्द्यावर भाष्य करत ठाकरेंच्या शिवसेनेला टोलाच लगावला. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर आताच काही बोलण्याची काहीच गरज नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी सातत्याने होतेय. काँग्रेस नेते मात्र या मागणीला अनुकूल नाहीत. मग राष्ट्रवादी काँग्रेसची याबाबत काय भूमिका आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले, आमच्यात कुणालाच इंटरेस्ट नाही. कुणाला प्रोजेक्ट करायचं नाही. आम्हाला फक्त सत्ता परिवर्तनाचं ध्येय. राज्यातील सत्तेत बदल घडवून लोकांना पर्याय कसा देता येईल यावर लक्ष केंद्रीत करू या. या मुद्द्याची (मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार) आता काहीच गरज नाही. मी ही मुख्यमंत्री होण्याचा तर प्रश्नच नाही, असे शरद पवार म्हणाले.

बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेवरही त्यांनी भाष्य केलं. पवार म्हणाले, बदलापुरची घटना हे सरकारचं अपयश आहे. शैक्षणिक संस्थांत असे प्रकार धक्कादायक आहेत. या घटनेचं लोण राज्यात पसरलं आहे. या घटनेच्या निषेधार्थ उद्या बंद पुकारण्यात आला आहे. संघर्षाच्या भूमिकेऐवजी आम्ही बंदचा पर्याय निवडला. प्रत्येक घटकाने या बंदमध्ये शांततेत सहभागी व्हावं. लोकांच्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी उद्या बंद आहे. कुणीही या घटनेचं राजकारण करू नये. आंदोलन राजकीय होतं असं सत्ताधाऱ्यांकडून बोललं गेलं ते योग्य नाही. कुणीही या मुद्द्याचं राजकारण केलेलं नाही. उद्याच्या बंद पाठीमागे आमचा कोणताच राजकीय हेतू नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.