“इंडियामध्ये पंतप्रधानपदासाठी अनेक पर्याय पण भाजपकडे पर्याय आहे का ?” – उद्धव ठाकरेंचं विधान
मुंबई, ३० ऑगस्ट २०२३: इंडिया आघाडीची उद्या (३१ ऑगस्ट) मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार, जागा वाटप कसं होणार, संयोजक कोण असणार या सर्व पार्श्वभूमीवर उद्या बैठक होणार असल्याचं सांगितलं जातंय. या बैठकीची माहिती देण्याकरता महाविकास आघाडीकडून आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
इंडिया आघाडीला अद्यापही संयोजक ठरवता आला नाही, ते पंतप्रधान काय ठरवणार अशी टीका भाजपाकडून सातत्याने केली जात आहे. यावरून पत्रकारांनी आज प्रश्न विचारल्यावर सुरुवातीला शरद पवारांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, “इंडिया आघाडीच्या संयोजकासाठी आम्ही किमान समान कार्यक्रम करू शकतो. या आधारे संयोजक ठरवू.”
शरद पवार बोलत असतानाच उद्धव ठाकरे यांनीही त्यांची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “पंतप्रधानांसाठी आमच्याकडे खूप पर्याय आहेत. पण भाजपाकडे काय पर्याय आहे? गेल्या १० वर्षांत त्यांनी काय केलं? सगळ्यांनी त्यांचा अनुभव घेतला आहे. कर्नाटकात पाहिलं आपण, कोणतंच यश मिळालं नाही. बजरंग बलीनेही त्यांना आशीर्वाद दिला नाही.”
जागा वाटपाबाबत काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले की, “आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरू केलेली नाही. पहिल्या दोन बैठका झाल्या त्या महत्त्वाच्या होत्या. उद्याच्या बैठकीत इथून पुढे सामूहिक कार्यक्रम काय असावा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्या शक्यतेवेळी असा निर्णय झाला तर काही लोकांवर ही जबाबदारी द्यावी लागेल. अन्य राजकीय घटक पक्षांशी संवाद साधून यातून आपण एकत्र जाऊ शकतो का यासंदर्भातील अभ्यास करण्याबाबत काही लोकांवर जबाबदारी सोपवावी लागेल.”
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टोलेबाजी केली आहे. ‘इंडिया’च्या तिसऱ्या बैठकीपूर्वीच केंद्र सरकारने २०० रुपयांनी गॅस सिलिंडरचा दर कमी केला. ‘इंडिया’ जसं जसं पुढे जाईल, तसं एक दिवस असा येईल, की केंद्र सरकार मोफत गॅस सिलिंडर देईल, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. “मी पहिल्या बैठकीत सांगितलं होतं की, मी विरोधीपक्ष असा शब्द मानत नाही. आम्ही आमच्या देशाची रक्षा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. भारतमातेचं रक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. हुकूमशहा आणि जुमलेबाजीला आमचा विरोधात तर आहेच. संजय राऊत यांनी जसं म्हटलं की, आमची तिसरी बैठक होणार आहे. तोपर्यंतच गॅस सिलिंडरचे दर २०० रुपयांनी कमी झाले”, असं ठाकरे म्हणाले.