तिकीट फायनल झालं, गावाकडं आलो अन् ठाकरेंनी शब्द फिरवला – रविकांत तुपकरांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई, ३ डिसेंबर २०२४: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून माझं तिकीट फायनल झालं होतं, परंतु उद्धव ठाकरेंनी अचानक शब्द फिरवला, असा मोठा गौप्सस्फोट रविकांत तुपकर यांनी केलाय. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत जावं, अशी सगळ्या कार्यकर्त्यांची भावना होती, असं शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले आहेत. आमच्या बैठका त्यांच्याबरोबर झाल्या. उद्धव ठाकरे साहेबांसोबत पाच-सात बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये मी त्यांच्यासोबत यावं, अशी उद्धव ठाकरे आणि शरद ठाकरे यांची इच्छा होती. यासंदर्भात शरद पवार, कॉंग्रेस यांच्यासोबत तर सर्वात जास्त उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठका झाल्या.

फायनल बैठकीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई, तेजस ठाकरे, विनायक राऊत, नार्वेकर असे आम्ही सगळे उपस्थित होतो. शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख त्या बैठकीला होते. त्या बैठकीत रविकांत तुपकर यांना तिकीट द्यायचं फायनल झालं. मला सांगण्यात आलं, तुम्ही गावाकडे जा. कार्यकर्त्यांची बैठक घ्या. माध्यमांतून घोषणा करा आणि तातडीने मुंबईला या. मातोश्रीवर आपण शिवसेना आणि शेतकरी संघटनेची युती झाली, असं जाहीर करू. एबी फॉर्म मात्र तुम्ही शिवसेना उबाठाचा घ्यायचा, असं मला सांगण्यात आलं होतं.

हे सगळं ठरवून मी गावाकडे आलो. काही जेष्ठ नेत्यांनी रविकांत तुपकर या मुद्द्यावर नको म्हणून अनेकांना कामाला लावलं. मला दिलेला शब्द उद्धव ठाकरे यांनी अचानक दुसऱ्या दिवशी फिरवण्यात आला. मला सांगण्यात आलं की, महाविकास आघाडीला पाठिंबा देतोय, अशी जाहीर घोषणा करू नका. बैठक तातडीने रद्द करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा मला मातोश्रीवर बोलवण्यात आलं. मला मग अंतर्गत पदाधिकाऱ्यांचं कारण देवून, त्यांनी भूमिका स्पष्ट केली. यामध्ये कॉंग्रेस विधान परिषदेचे आमदार देखील सहभागी असतील, असं रविकांत तुपकर म्हणाले आहेत.

अनेक नेते मंडळी पक्ष सोडून रविकांत तुपकर नको, या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. काही लोकांना भीती आहे की, रविकांत तुपकर आमदार झाल्यास असुरक्षिततेचं वातावरण त्यांच्यात निर्माण झालं. सगळ्या नेत्यांनी वेगवेगळे फंडे वापरले. आमच्यासमोर वाढलेले ताट हिसकावून घेण्यात आले. केसाने गळा कापण्याचा प्रयत्न झाला, असं देखील रविकांत तुपकर म्हणाले आहेत. माझ्या तिकीट कापण्याचा घटनाक्रम सत्य आहे, असं देखील तुपकर म्हणाले आहेत.