पुण्यात ठरणार भाजपच्या ‘महाविजया’ ची रणनीती; ७ जानेवारीला खास बैठक
पुणे, ४ जानेवारी : आगामी लोकसभेत विजयाची हॅट्रिक करण्यासाठी भाजपकडून राज्य आणि देशपातळीवर मायक्रो प्लॅनिंग केले जात आहे. ‘तिसरी बार मोदी सरकार, अबकी बार ४००’ पार असा नारा देत भाजपनं लोकसभेसाठी रणशिंग फुंकले आहे. महाविजय २०२४ ची रणनीती पुण्यात आखली जाणार आहे. येत्या ७ जानेवारी रोजी पुण्यातील बाणेर परिसरात एका खास बैठकीचे नियोजन भाजपकडून करण्यात आले आहे.
आगामी लोकसभेसाठीची ही बैठक बाणेर येथील बंटारा भवन हॉल येथे ७ जानेवारी रोजी सकाळी १० ते ५.३० या वेळेत होणार असून, बैठकीत सहभागी होणाऱ्या खास निमंत्रितांना राष्ट्रीय संघटक सरचिटणीस बी. एल. संतोष, राष्ट्रीय संहसंघटक मंत्री शिव प्रकाश यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार आहेत.
अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिंदे-फडणवीस आणि अजित पवार असे त्रिशूळ सरकार अस्तित्वात आले आहे. एकीकडे हे तिन्ही नेते सरकार वेगाने काम करत असल्याचे वेळोवेळी सांगत आहेत. परंतु, २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सर्वाधिक जागा येतील असा अंदाज एका समोर आलेल्या सर्व्हेक्षणातून वर्तवण्यात आला आहे. या आकडेवारीनंतर भाजपसह महायुतीतील नेत्यांना धडकी भरली आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा असून, नुकत्याच कऱण्यात आलेल्या एका सर्व्हेक्षणात लोकसभेच्या ४८ जागांपैकी सर्वाधिक म्हणजेच २६ ते २८ जागा मविआला मिळतील असे सांगण्यात आले आहे. शिंदे-फडणवीसांच्या महायुतीला १९ ते २१ जागा तर २ जागा इतरांना मिळू शकतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा निश्चिय केला आहे. यासाठी अगदी ग्राऊंड लेव्हलला जाऊन काम केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या ७ जानेवारी रोजी पुण्यातील बाणेरमध्ये खास निमंत्रितांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु, या बैठकीसाठी पुण्यातील आणि महाराष्ट्रातील नेमक्या कोण कोणत्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे याची कोणतीही माहिती भाजपकडून देण्यात आलेली नाही.