सत्ताधार्यांना वाटतय मी घाबरलोय पण जे घाबरले यापूर्वीच पळून गेले – रोहित पवार

मुंबई, १ फेब्रुवारी २०२४: सत्तेतल्या नेत्यांना वाटतं की आम्ही घाबरलोयं पण आधी जे घाबरले ते पळून गेले सर्वांनी बघितलं असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा ईडी चौकशीनंतरही तोरा कायम असल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान हे वक्तव्य करताना रोहित पवार यांनी भाजपवर टीका करताना अजित पवारांवर देखील अप्रत्यक्ष हल्ला केला.

बारामती अॅग्रो प्रकरणी रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. आठ तासांच्या ईडी चौकशीनंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

रोहित पवार म्हणाले, ईडीची चौकशी अशी सुरु आहे जशी मुंबई शहरामध्ये कुणीतरी सोन्याचा हंडा लपवला असंच सांगितलंय. त्यामुळे या कोपऱ्यात जा, त्या कोपऱ्यात जा, काहीही कर, जे विचारायचं ते विचार पण हा लपलेला कथित हंडा कुठे आहे हे शोधण्याचं काम काही लोकांकडे केलं जात आहे. सत्तेतल्या नेत्यांना वाटत असेल की आम्ही घाबरलो आहोत. मला त्यांना एकच सांगायचं आहे, याआधी जे घाबरले ते पळून गेले सर्वांनी बघितलं असल्याचं रोहित पवारांनी ठणकावून सांगितलं आहे.

तसेच देशात आणि महाराष्ट्रात जे काही चुकीचं चालू आहे, लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, तपास यंत्रणांच्या माध्यमातून जो काही प्रयत्न होतोय त्याला विरोध करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते उपोषण करत आहेत. त्यांना मी विनंती करण्यासाठी महाराष्ट्राच्या वतीने तुमचे आभार व्यक्त करतो. मी विनंती करतो की, त्यांनी उपोषण मागे घ्यावं, असं रोहित पवार आपल्या म्हणाले आहेत.
मी ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंत काही लोकांनी सांगितलं की, राज्याच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या पदाधिकारी, नागरीक, कार्यकर्त्यांनी, काही लोकांचं तर राजकारणाशी काही देणंघेणं नव्हतं अशा लोकांनी लोकशाहीचा आवाज ज्या पद्धतीने दाबला जातोय, तसंच सामान्य माणसांच्या मुद्द्यावर चर्चा केली जात नाही, त्यामुळे सामान्य लोकांच्या वतीने लढत असताना आपल्यावर कारवाई होत असेल, तर ते जिल्ह्यांमध्ये सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन लढले, कलेक्टर, तहसीलदारांना भेटले, त्यांनी आंदोलन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो की जनतेचा आवाज त्यांनी शासनापर्यंत पोहोचवला”, असं रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, बारामती अॅग्रो प्रकरणी आज रोहित पवार यांची चौकशी झाल्यानंतर पवार यांना पुन्हा ईडीकडून चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. येत्या ८ फेब्रुवारीला रोहित पवार यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आलं असून आता ८ फेब्रुवारीला ईडी चौकशीत काय घडतं? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.