निकालापूर्वीच संभाव्य विजेत्या बंडखोराच्या संपर्कात नेते

मुंबई, २१ नोव्हेंबर २०२४ ः राज्यात मागील दोन दिवसांपासून विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. काल मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. २३नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. आता पुन्हा राज्यात बंडखोरी होण्याची चिन्हे दिसत आहे. कारण एक्झिट पोलचा अंदाज पाहता या निवडणुकीत बंडखोर आणि अपक्ष उमेदवार महत्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना जवळ करण्यासाठी महाविकास आघाडी व महायुतीचे नेते आत्तापासूनच सरसावले आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती एकमेकांसमोर कडवं आव्हान बनून उभे ठाकले आहेत. यामध्ये एकूण सहा पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी दोन्ही आघाड्यांची नेतेमंडळी बंडखोरांना आपापल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतील. जर संख्या आकडा बहुमतापर्यंत गेला नाही तर २८८ जागांपैकी १४५ जागा मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांना बंडखोर अन् अपक्ष उमेदवारांचं सहकार्य घ्यावं लागणार आहे. हे दोन्ही घटक सरकार स्थापनेत प्रमुख पक्षांच्या संख्येमध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहेत.

दरम्यान आता एक मोठी माहिती समोर आलीय. महाविकास आघाडीने या बंडखोरांसोबत संपर्क सुरू केल्याची माहिती मिळत आहेत. राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीसाठी सहा पक्ष मैदानात आहेत. त्यात आता २८८ पैकी एक तृतीयांश मतदारसंघामध्ये बंडखोरी झालीय. ५० प्रमुख बंडखोर आहेत, ते दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या संभाव्यतेला धक्का पोहोचवू शकतात. महाविकास आघाडीने बंडखोर अन् अपक्ष उमेदवारांना संपर्क करण्यास सुरूवात केलीय.

महाविकास आघाडीचे नेते बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील यांची नावं समोर आली आहेत. जे बंडखोर उमेदवारी होऊ शकतात, अशा व्यक्तींसोबत संपर्क करत असल्याची माहिती मिळतेय. निकाल लागण्याआधीच आता पु्न्हा राजकीय वर्तुळातील हालचालींना वेग आलाय. प्रमुख बंडखोरांनी दोन्ही आघाड्यांतील अधिकृत उमेदवारांच्या विजयाची शक्यता कमी केल्याचं चित्र आहे.

सध्याच्या विधानसभा निवडणुकीची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यापूर्वी नवं सरकार स्थापन होणं अनिवार्य आहे. संवैधानिकदृष्ट्या त्यापूर्वी केवळ विधानसभा गठित व्हावी लागेल. त्यानंतर निवडणूक अधिकारी अधिसूचनेचा मसुदा राज्यपालांकडे सादर करतील. कोणाचं सरकार येईल, पुन्हा बंडखोरी होणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे २३ नोव्हेंबर रोजीच स्पष्ट होणार आहेत.